बेरोजगारीवर शेती पर्याय ठरू शकते

गेल्या काही वर्षांमध्ये देशातच नव्हे तर राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणात पुढे सरकल्या आहेत. त्यामुळे शेतीपेक्षा नोकरीलाच त्यांच्याकडून पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे शिक्षणावर लाखो रुपय खर्च करुनही अपेक्षेप्रमाणे नोकऱ्या मिळत नसल्याने भेटेल त्याठिकाणी आणि भेटेल तेवढ्या पगारावर ही मुले नोकरी करत आहेत. पण शेतीकडे ढुंकूनही बघत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत बेरोजगारीला शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेतीबरोबर शेतीवर आधारित व्यवसाय सुरू करुन मोठ्या प्रमाणात आथिंक भरभराट होऊ शकते हे ग्रामीण भागातील काही तरुणांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेती व शेतीवर आधारित उद्योग व्यवसायाची वाट चोखाळणे गरजेचे आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. औद्योगिकीकरण हे जरी वाढत असले तरी शेती व शेतीवर आधारित व्यवसायाचे महत्त्व अजूनही टिकून आहे व हे स्थान भविष्यामधेही टिकून राहणार यात शंका नाही. याचबरोबर, जरी शहरीकरण वाढत असले तरी अजूनही ग्रामीण विभागामध्ये राहणाऱ्या जनतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक प्रयोग करून कृषी क्षेत्राने अन्नधान्य तसेच इतर उत्पादनांमध्ये जरी भरीव वाढ घडवून आणली तरी अजूनही शेती व्यवसाय हा मोसमी पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांत शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्येमुळे शेतीव्यवसाय हा अधिकच बेभरवशाचा आहे असे दिसून आले. यामधून मार्ग काढण्यासाठी शेतीला पूरक असे व्यवसाय सुरू करून त्यांचे योग्य ते व्यवस्थापन करणे की ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळेल. या दृष्टीने जोमाने प्रयत्न करणे आवश्‍यक ठरले आहे.

ग्रामीण व शेतीव्यवसाय व्यवस्थापन हे मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आदी इतर स्पेशलायझेशनच्या तुलनेत, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काहीसे कमी पसंतीचे आहे. मात्र, या क्षेत्राचे एकूण अर्थव्यवस्थेतील स्थान, हे इतर विषयांइतकेच महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आवश्‍यक आहे. रुरल ऍण्ड ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट या स्पेशलायझेशनखालील विषयांचा समावेश होतो.

आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे स्थान काय आहे हे समजण्याच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे. हरितक्रांती म्हणजे काय, ती कशी घडवून आणली गेली, त्यामध्ये काय नियोजन होते व हरितक्रांती यशस्वी होण्यामागे काय कारणे होती व काय परिश्रम घेतले गेले या सर्वाचा अभ्यास आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पिके घेण्याची काय पद्धत होती, जमिनीविषयक सुधारणा, (लॅंड रिफॉर्मस्‌) त्यांची आवश्‍यकता आणि पद्धती यांचाही समावेश या विषयामध्ये होतो. याशिवाय शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, तसेच अन्नसुरक्षा कायदा यासंबंधीची माहिती या विषयामध्ये मिळते. शेती व्यवसायामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या व्यवसायातील नवीन प्रवाह समजून घेणे आवश्‍यक ठरते. या दृष्टीने सहकारी तत्त्वावरील शेती, शेतीमधील यांत्रिकीकरण तसेच जागतिक स्तरावर उपयोगात आणल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचा समावेश होतो. शेती व्यवसायामध्ये असलेली मजुरांची उपलब्धता, मजुरीविषयक कायदे, वेठबिगारी पद्धत व ती बंद करण्यासाठी केलेले उपाय, असंघटित मजुरांचा प्रश्‍न या सर्वाचा एकत्रित अभ्यास करण्याची संधी या विषयामध्ये मिळते. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था व शेती या विषयामधून शेती, शेती व्यवसाय व भारतीय अर्थव्यवस्था यामधील परस्परसंबंध तसेच शेती व्यवसायातील आजची परिस्थिती, त्यांच्यासमोरील समस्या व त्यावर मार्ग काढण्यासाठीच्या उपाययोजना, जागतिक स्तरावरील घडामोडी या सर्वाचा अभ्यास या विषयामध्ये होतो.

कोणत्याही व्यवसायाचे यश त्याचे मार्केटिंग कसे केले जाते यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. या दृष्टिकोनातून ग्रामीण विभागातील मार्केटची रचना कशी असते त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मार्केटिंग करताना काय विचार करावा लागतो याचाही अभ्यास करणे आवश्‍यक आहे. या दृष्टीने ग्रामीण अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे, तसेच ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, राजकीय पर्यावरण कसे आहे आणि या सर्वाचा ग्रामीण भागातील मार्केटिंगवर काय परिणाम होतो याचाही समावेश या विषयात होतो. मार्केटिंगचे यश हे ग्राहकाला समजून घेऊन त्याच्या गरजेप्रमाणे वस्तू उपलब्ध करून देण्यामध्ये आहे. या दृष्टीने ग्रामीण विभागातील ग्राहक आणि त्याच्या आवडीनिवडी तसेच त्याचे मानसशास्त्र याची माहिती करून घेतली पाहिजे. ग्रामीण भागातील ग्राहकांची निर्णय घेण्याची प्रक्रियासुद्धा समजून घ्यायला हवी. या दृष्टीने बाजारपेठांचे संशोधन हे गरजेचे ठरते. तसेच मार्केटिंगमधील नवीन तंत्रे ग्रामीण विभागात वापरणे याचीही नितांत गरज आहे.

ग्रामीण विभागामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांनी ग्रामीण विकास या संकल्पनेचा नीट अभ्यास करायला हवा. ग्रामीण विभागाच्या विकासाची आवश्‍यकता तसेच ग्रामीण विकासाचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, ग्रामीण विभागामध्ये शाश्‍वत विकासासाठी कोणते प्रयत्न आवश्‍यक आहेत या सर्वाची माहिती या विषयावरून मिळते.
ज्याप्रमाणे, ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग उभारणे हे आवश्‍यक आहे त्याचप्रमाणे या उद्योगांमधून तयार होणाऱ्या वस्तूंचे मार्केटिंग करणे हेही तितकेच आवश्‍यक आहे. मार्केटिंग म्हणजे केवळ वस्तू मार्केटमध्ये विकणे असा नसून, वस्तू उत्पादन केल्यापासून मार्केटमध्ये आणण्यापर्यंतच्या सर्व कार्याचा समावेश यामध्ये होतो. म्हणजेच शेतीमाल तयार झाल्यानंतर, त्याची साठवणूक करणे, वाहतूक करणे व वितरण साखळी तयार करून माल बाजारपेठेत पोहोचवणे याचा समावेश मार्केटिंगमध्ये होतो. यामध्ये सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, शेतीमालाचे मार्केटिंग करण्यासाठी योग्य ती व्यवस्था अजूनही उपलब्ध नाही. तसेच या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. या दृष्टीने या विषयाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. मार्केटिंग शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी, उपलब्ध असलेल्या विविध प्रक्रिया, उदा. साठवणूक कशा पद्धतीने करावी, तसेच वस्तूंची किंमत कशी ठरवावी या गोष्टींचे मार्गदर्शन या विषयातून मिळते. त्याचप्रमाणे किमतीचा भविष्यकालीन अंदाज कसा घ्यावा याचाही समावेश या विषयामध्ये होतो.

मार्केटिंगबरोबरच, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये वित्तपुरवठय़ाचे महत्त्व मोठया प्रमाणावर आहे. शेती व्यवसायाला वित्तीय पुरवठा करण्याची सध्याची पद्धत काय आहे तसेच वित्तीय पुरवठय़ाचे काय महत्त्व आहे यासंबंधीची माहिती या विषयातून मिळते. ग्रामीण विभागामध्ये तसेच शेती व्यवसायाला भांडवलाचा पुरवठा करण्यामध्ये सहकारी, बॅंकांनी मोठय़ा प्रमाणावर हातभार लावला आहे. या दृष्टीने सहकारी बॅंका व त्यांनी केलेला वित्तपुरवठा याचा अभ्यास या विषयातून करता येतो. तसेच कर्ज घेताना, धोक्‍याचे व्यवस्थापन (रिस्क मॅनेजमेंट) कसे करावे याची माहितीसुद्धा होते. ग्रामीण विभागाच्या विकासामध्ये मायक्रो फायनान्स या पद्धतीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचाही समावेश या विषयामध्ये होतो.

वरील महत्त्वाच्या विषयांबरोबरच, शेती व्यवसायामध्ये उपलब्ध असलेल्या संधीसुद्धा विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजेत. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, उदा. फुलशेती, फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग, बायोटेक तंत्रज्ञानावर आधारित उद्योग, पशुखाद्ये तयार करणारे उद्योग, पोल्ट्रीफार्मस्‌ इ. अनेक विषयांवर आधारित एक विषय या अभ्यासक्रमामध्ये आहे. याशिवाय शेती व्यवसायामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर व त्याचा उपयोग, भविष्यातील प्रवाह, आदी अनेक विषयांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये होतो.

ग्रामीण व शेती व्यवसाय व्यवस्थापन हा ग्रामीण विभागाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेला विषय आहे. प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज ही ग्रामीण विभागामध्ये प्रकर्षांने भासते. शिक्षणानंतर फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येच नोकरी केली पाहिजे किंवा फक्त माहिती तंत्रज्ञानविषयक कंपन्यांकडेच नोकरी केली पाहिजे असे नसून आपल्या मनोवृत्तीमध्ये थोडा बदल करून शेती व ग्रामीण विभागाकडे लक्ष दिल्यास सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करता येईल हे निश्‍चित.

Leave A Reply

Your email address will not be published.