महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणातील आदेश
माळेगाव- माळेगाव (ता. बारामती) येथील पीर राजबक्सार दर्गाह कब्रस्तान व इदगाहसाठी श्रीमंत राजे रत्नसिंग शंभुसिंग जाधवराव जहागीरदार संस्थान, माळेगाव बुद्रुक यांनी इनाम दिलेल्या जागेची नोंद इनाम वर्ग-3 अशी न लावता रीत-3 अशी केल्याने सदर देवस्थान जागेची विक्री झाल्याने श्रीमंत विक्रमसिंह राजे जाधवराव, रहिमान शेख व फैय्याज शेख यांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, याठिकाणी दाखल केलेल्या अंतरिम मनाई अर्जास न्यायालयाने प्रतिवादी हजर राहीपर्यंत मनाईचा आदेश वक्फ बोर्डाचे न्यायाधीश मे.एम.वाय.ए.के. शेख आणि सहायक सचिव खलिद बी.अरब यांनी प्रारीत केला आहे. तुम्हाला दिलेली एकतर्फी तात्पुरती मनाई, का कायम करण्यात येऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.
सदरचे क्षेत्र राजे रत्नसिंह शंभूसिंह जाधवराव यांनी 1952 साली वक्फ संस्था पीर राजे बागसवार दर्गा यांना दिल्याचे रेकार्ड सादर करण्यात आले आहे. तसेच, सदर क्षेत्रात सन 1939 पासून ते आजपर्यंत 7/12 सदरी वक्फ पीर राजे बगसवार यांची मालकी नोंद असल्याचे दिसून येत आहे. वादींनी दाखल केलेली खरेदीखते व वर्तमानपत्रातील कटींग यावरुन प्रतिवादी हे दावा मिळकत डेव्हलप करुन विक्री करण्याचे दिसत आहे. म्हणून वरील सर्व महत्वाची कागदपत्रे विचारात घेता प्रथमदर्शनी पुरावा पाहता दावा मिळकती संबंधी तिऱ्हाईत इसमांचे हितसंबंध निर्माण करुन पुढील भविष्यातील अडचणी निर्माण होऊ नये, याकरिता सदरचा आदेश प्रारीत केला आहे. याबाबत दि. 17 मे 2019 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तसेच, वादी यांनी सिव्हील प्रोसेजर कोर्ट 1908 ऍक्ट 33 रुल नं. 3 याची कारवाई करावी, असेही म्हंटले आहे.
सदरची जागा वक्फ बोर्डाची नसल्याबाबतचे दस्तऐवज वरील नेमलेल्या तारखेपर्यंत प्रतिवादी यांनी सादर करावे, असेही म्हंटले आहे. वादी यांनी एकूण 45 जणांना प्रतिवादी केले आहे. वादीतर्फे ऍड. उदय दळवी, औरंगाबाद व ऍड. अहमदखान पठाण, पुणे यांनी पाहिले तसेच सिराज शेख, आसिफ शेख, शकील सय्यद, पुणे यांनी सहकार्य केले. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, गावतलाठी, मंडल अधिकारी आदी ठिकाणी सदर आदेशाची प्रत देण्यात आली आहे.