पुणे – जहॉंगिर रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि जहॉंगिर हॉस्पिटल ऍन्ड मेडिकल सेंटर कामगार युनियन यांच्यात मैत्रीपूर्ण करारानंतर पंधरा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने वेतनवाढ आणि कर्मचारी यांच्या पती किंवा पत्नी यांना मोफत उपचार देणे या दोन मुद्द्यांवर हा करार झाला असल्याचे युनियनच्या अध्यक्षा मनीषा धिवार यांनी सांगितले.
“कामगार दिना’दिवशी (दि. 1) जहॉंगिर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी लढा उभारला. त्यामध्ये “हॉस्पिटलमधील कामगार आणि त्याचे पती किंवा पत्नी तसेच 21 वर्षे पूर्ण झालेले दोन मुले, आई-वडील यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात, वार्षिक सुट्ट्या, दिवाळी बोनस (वार्षिक पगाराच्या 20 टक्के किंवा 20 हजार रुपये), वार्षिक वेतनवाढ, गेली 8 ते 10 वर्षे हंगामी कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करणे या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे. मात्र, हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला वारंवार नोटीस देऊनही करार केला जात नव्हता.
त्यामुळे आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक व्यक्तींनी त्यामध्ये मध्यस्थी केली. अखेर बुधवारी (दि. 15) हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक जॉर्ज इपेन आणि युनियनमध्ये झालेल्या चर्चेनंतर मैत्रीपूर्ण करार झाला असून, आंदोलन मागे घेण्यात आल्याचे हॉस्पीटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हा करार तीन वर्षांसाठी असून त्यामध्ये 2 हजार 620 रुपये पगारवाढ आणि कर्मचाऱ्यांचे पती किंवा पत्नी यांना औषधोपचार मोफत असा करार झाल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.