संसदेत विकासासाठी उमेदवार पाठवयाचा, की कुंभमेळा भरवायचा?

चाकण-पंधरा वर्षे खासदार निष्क्रिय ठरुनही आता ते एका व्यक्तीला पंतप्रधान करा म्हणून मते मागत आहेत. मग संसदेत विकासासाठी उमेदवार पाठवायचा की कुंभमेळा भरवायचा, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवतीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी सेना -भाजप सरकार पर्यायाने खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या अकार्यक्षमतेचा समाचार घेतला आणि डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहनही केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ चाकणमधील मार्केटयार्ड येथील सभेत सक्षणा सलगर बोलत होत्या. यावेळी दिलीप मोहिते, रामभाऊ कांडगे, बाबासाहेब राक्षे, विलास कातोरे, पुजा बुट्‌टे, कैलास सांडभोर, एस. पी. देशमुख, हिरोआण्णा सातकर, संध्या जाधव, सुरेखा मोहिते, पूजा पिंगळे, अमृता गवारे, बेबीताई बनकर, जीवन सोनवणे, जे. बी. परदेशी, अनिल देशमुख, आदेश मोहिते, पुणे जिल्हा युवती अध्यक्षा पुजा बुट्‌टे पाटील, प्रियंका पवार आदी उपस्थित होते.

सलगर म्हणाल्या, खासदारांनी काय विकास केला आहे? पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, वाढती वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक रेल्वे प्रलंबित इतकेच काय तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ स्थलांतरित झाले. तरीही या खासदारांना काहीच करता आले नाही. आता कोणाच्या नावाने मते मागत आहेत, याचे भानही या त्यांना नाही. शिवसेनेवर टीका करताना त्या म्हणाल्या खुरपणी माहित नसलेले शेतकऱ्यांसाठी काय करणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यात पेंग्विनसारखे दिसणारे आदित्य ठाकरे काय विचारतायत? तुम्हाला नेता पाहिजे की अभिनेता आता काय बोलायचे? अशा शब्दांत आदित्य ठाकरेंवर त्यांनी टीका केली.

दिलीप मोहिते म्हणाले पीएच.डी. घेतल्याची भाषा करणाऱ्या खासदारांची विद्वत्ता लोकसभेत का दिसली नाही. तुमचे मंत्रीच कबुली देत आहे की, विमानतळ स्थलांतरित होण्यामध्ये आढळरावांची सर्वांत मोठी चुक आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांवर टीका करताना बापट तुम्हाला पटतं का? ज्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तुम्ही त्यांच्या सभेला येता. चाकणच्या दंगलीत अनेक तरुण अटकेत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता? असा प्रश्‍न करुन सुरेश गोरे व आढळराव यांना मराठा तरुण माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)