पाथर्डी: बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराशी हातमिळवणी करणाऱ्या वनाधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी चिंचपूर इजदे ग्रामस्थांनी पाथर्डी-बीड महामार्गावर चिंचपूर फाटा येथे सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. वरिष्ठ वन अधिकाऱ्याबरोबर तत्काळ बैठक बोलावून संबंधित प्रकरणाची चौकशी करू व त्यानंतर दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, चिंचपूर इजदे ते नवगण राजुरी (जि.बीड) या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून बारा मीटरपर्यंत अंतरापर्यंतचे वृक्ष तोडण्याचा परवाना बीड वन विभागाने ठेकेदाराला दिलेला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने पाथर्डी वनविभागाची कुठलीही परवानगी न घेताच पाथर्डी हद्दीतील वृक्षतोड केली आहे. त्याचबरोबर चिंचपूर इजदे येथील शेतकरी आजिनाथ खेडकर यांचे शेतालगत असलेले चिंच, लिंब व बाभूळ हे तीन झाडे रस्त्याच्या मध्यापासून 14 मीटर अंतरावर असतानाही बेकायदेशीरपणे तोडलेले आहेत.
याबाबत खेडकर यांनी पाथर्डी वनाधिकारी व पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. खेडकर यांच्या तक्रारीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व नियमबाह्य वृक्षतोड केल्याचे मान्य केले. संबंधित ठेकेदाराचा टेम्पो, वृक्षतोड करण्याची साधने व मजूर यांना ताब्यात घेतले. मात्र रात्रीतून ठेकेदाराचा टेम्पो व इतर साहित्य कुठलीही कारवाई न करता टेम्पो सोडून देण्यात आले. वनाधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे शेतकरी आजिनाथ खेडकर यांनी वनाधिकाऱ्यांनी आर्थिक लोभापायी ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे.
जिल्हा वनाधिकारी यांच्याकडे तक्रार करून पाथर्डी वनपरिक्षेत्रातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आज सकाळी नऊ वाजता बीड- पाथर्डी महामार्गावर चिंचपूर फाटा येथे शेकडो ग्रामस्थांसमवेत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बोलताना खेडकर म्हणाले, शासन एकीकडे झाडे लावण्याची घोषणा करत असून दुसरीकडे मात्र वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे. रस्ता रुंदीकरणात अशा अनेक झाडांची बेकायदा कत्तल झालेली आहे, त्याची चौकशी व्हायला हवी. तसेच बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कारवाई करा. मी तक्रार केल्यानंतर बीड येथील ठेकेदाराने बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याचे पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मान्य होते, तसा पंचनामा केला जातो.
मात्र रात्रीतून ठेकेदाराशी हातमिळवणी केल्यानंतर हेच अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करतात. थातूरमातूर दंडाची कारवाई केल्याचे तोंडी सांगतात. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका खेडकर यांनी घेतली.
पाण्याअभावी दररोज वन्यप्राण्यांचा तडफडून मृत्यू होत आहे, त्याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आंदोलनाशी चर्चा करून संबंधित प्रकरणाबाबत दोन दिवसात वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी व ग्रामस्थांची बैठक बोलावून योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यांनतर सुमारे तीन तास चालू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार पाटील व पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांनी बेकायदा वृक्षतोड झालेल्या ठिकाणांवर जाऊन पाहणी केली. आंदोलनात अजिनाथ खेडकर, दत्ता खेडकर, बबन खेडकर, भाजपा युवामोर्चाचे अमोल गर्जे, गोकुळ दौंड , रणजित बेळगे, अर्जुन धायतड्क, विठ्ठल मिसाळ, कुंडलीक नागरगोजे, बबलू खेडकर, अजिनाथ नागरगोजे, म्हातारदेव खेडकर, तुकाराम नागरगोजे, नवनाथ खेडकर, विनायक खेडकर आदीसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.