आघाडीच्या भूमिकेबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती
रेडा- बारामती लोकसभा निवडणूक तसेच आघाडी धर्म आदीं मुद्यांवर चर्चा करण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. विधानसभेलाही आघाडी धर्म पाळू, असा शब्द दिल्याने बारामती मतदारसंघासह जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मदत करणार आहे, असे कॉंग्रेसचे नेते, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
इंदापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसची भूमिका मांडताना माजी मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले की, पवार आणि सुळे यांनी ज्यावेळ ी भेट घेतली त्यावेळी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेसचे लोकसभा परिक्षेत्रातील आमदारही उपस्थित होते.
कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे इंदापूर विधानसभेच्या संदर्भामध्ये निर्णय घेतील, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेस ताकतीनिशी साथ द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. पुणे, बारामती लोकसभा निवडणुकीसाठी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच मित्रपक्ष 2014 पासून पोटनिवडणुकीत एकत्र आले; त्यामुळेच तब्बल 26 भाजपला गेलेल्या जागा पुन्हा मिळवता आल्या. राज्यात महाआघाडी गटबंधन निर्माण केले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.