जमीन विकून अन्‌ कर्ज काढून बांधले शिवरायांचे मंदिर

हिंगणेतील शेतकऱ्याच्या शिवप्रेमाचे होतंय सर्वत्र कौतुक

वडूज – खटाव तालुक्‍यातील वयोवृद्धाने चक्क स्वतःची जमीन विकून आणि सोसायटीचे कर्ज काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे. भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट देतानाची कलाकृती मंदिरात बसवण्यात येणार आहे. पांडुरंग रायते यांनी केलेल्या या अनोख्या मंदिराचे मात्र सगळीकडे कौतुक होत आहे. काही दिवसातच हे मंदिर पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगणे हे खटाव तालुक्‍यातील गाव. येथील पांडुरंग रायते हे या गावात शेती करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेवर त्यांची अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेतूनच त्यांनी भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्याचा मानस केला होता. मात्र परिस्थिती जेमतेम असल्याने हे मंदिर कसे उभे करायचे असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा राहिला. मात्र काहीही करून हे मंदिर उभे करायचेच अशी जिद्द त्यांनी बाळगली होती.

दरम्यानच्या काळात पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांनी मंदिर उभारण्यासाठी गावातील स्वतःची जमीन विकून टाकली. विकलेल्या जमिनीतून आलेल्या पैशात त्यांनी मंदिराचे काम सुरू केले. मात्र कालांतराने ते ही पैसे संपले.
यावेळी मात्र त्यांनी गावात असलेल्या सोसायटीतून कर्ज घेतले आणि स्वतःच्या जागेत हे मंदिर उभं करण्यास सुरुवात केली. सध्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मंदिराला एक कळसही बसवण्यात आला आहे. मंदिरात बसवली जाणारी मूर्ती ही पंढरपूर येथे बनवण्यासाठी दिली आहे.

काही दिवसांतच मूर्ती तयार झाल्यानंतर या मंदिरात मूर्ती बसवली जाणार आहे. रायते यांनी त्यांच्या राहत्या घरावरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे चित्र काढले आहे. रायते हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे शेतीची अनेक अवजारेही आहेत. त्यांनी बांधलेल्या या मंदिराची पाहणी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक गर्दी करीत असतात. तर ऑक्‍टोबर महिन्यात 25 तारखेला या मंदिरात मूर्ती बसवून मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेवर माझी मनापासून श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी मी छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेची साडेचार फुटाची मूर्ती बनवण्यासाठी पंढरपूर येथे दिली आहे आणि ती मूर्ती मिळाल्यानंतर मी या मंदिरात त्याची स्थापना करणार आहे.

पांडुरंग रायते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)