खेडमध्ये जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली

आंबेठाण -खेड तालुक्‍यांमध्ये शिक्षण विभागाने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढलेली आहे. तालुक्‍यात यंदा इंग्रजी माध्यमाची 720 मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आलेले यश, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 234 विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, 100 टक्के डिजीटल शाळा, नवोदय परीक्षेची तयारी, प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच गणित विज्ञान विषयांची विशेष तयारी, विज्ञान प्रदर्शनात मिळवलेले यश, मूल्यवर्धन कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा व्यक्तिमत्व विकास, शिक्षक शाळेमध्ये घेत असलेले जादा तास, विद्यार्थ्यांसाठी शिक्षक ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढलेली आहे. पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळा बद्दल आस्था निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून या शैक्षणिक वर्षात पहिली ते तिसरी या वर्गात शिकणारे इंग्रजी माध्यमाचे एकूण 720 विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, कार्यानुभव, चित्रकला या विषयांवर भर दिला जातो. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या, मोफत सायकल, तसेच दुपारचे जेवण दिले जाते. यामुळे मोफत शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्यामुळे पुन्हा एकदा पालकांचा ओढा या जिल्हा परिषद मराठी शाळांकडे सुरू झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सर्व विषय एकटाच शिकवत आहे व तो निष्ठेने व आपुलकीने शिकवीत असल्यामुळे केवळ शिक्षणच नाही तर जिव्हाळा प्रेम देण्याचे काम ते करत आहेत. परिणामी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे अतुत नाते निर्माण झाले आहे. यासाठी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचे सतत मार्गदर्शन असते. तसेच ते शिक्षकांचे कौतुक करतात व शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. असे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)