पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील सांस्कृतीक कार्यक्रमासाठी भाडे तत्वाने देण्यात येणाऱ्या ” कुंडी’ चे दर 100 पटीने महागणार आहेत. महापालिका या पुढे एका कुंडीसाठी प्रतीदिन 1 रूपयां ऐवजी तब्बल 100 रूपयांचे भाडे आकारणार आहे. तर या कुंडीसाठी ठेवायची अनामत रक्कमही प्रतीकुंडी 10 रूपयांवरून 300 रूपये केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने स्थायी समितीत ठेवला आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून महापालिकेच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त नागरीक, खासगी संस्था, सरकारी संस्था, निशशासकीय मंडळे, मंडळे महापालिकेचे सभासद तसेच इतर लोकप्रतिनिधींना त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम तसेच खासगी कार्यक्रमांसाठी शोभिवंत झाडांच्या कुंडया भाडेतत्वार दिल्या जातात. मात्र, त्यासाठी अगदी नगण्य शुल्क आकारले जाते. मात्र, अनेकदा कार्यक्रमानंतर या कुंडयांची चोरी झालेली असते अथवा त्याची मोडतोड झालेली असते. त्यातच, वर्षभर या कुंडयांची देखभाल दुरूस्ती करणे आणि ती तयार करण्यासाठीही महापालिकेस मोठा खर्च करावा लागतो. परिणामी प्रशासनास आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने या कुंडयांचे भाडे वाढविण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला असून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे.