डिंभे- गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 64 टक्के पाणीसाठा आहे.
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा हा सह्याद्री पर्वत रांगांचा असल्याने डोंगराच्या आच्छादनाखाली तसेच समुद्र सपाटीपासून उंच भाग असल्याने याठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असते. तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व ओढे, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे डिंभे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
अनेक गावांच्या पाणीयोजना घोडनदीवर अवलंबून असून त्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. घोडनदीच्या पात्रातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नदीपात्रातील विजेच्या मोटारी काढल्या आहेत.