पुणे – “झिका’बाधित सापडलेल्या गावातील आणि अन्य पाच गावांमधील रक्तजल सॅंपल घेतलेल्या 20 गरोदर महिलांपैकी 5 महिला चिकनगुनिया पॉझिटिव्ह असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’च्या (एनआयव्ही) अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
31 जुलै रोजी “झिका’ विषाणूची लागण झालेला रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील सहा गावांमध्ये केलेल्या तपासणीचे हे निष्कर्ष असल्याचे राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
“झिका’ विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती आणि त्यांच्या अर्भकांना आहे. याची लागण जर गरोदर महिलांना झाली तर त्यांच्या अर्भकाच्या मेंदूची वाढ खुंटते आणि त्याचा डोक्याचा घेरही कमी होतो. त्यामुळे राज्याच्या पथकाने याभागात सर्वेक्षण करून 20 गरोदर महिलांचे रक्तजल नमुने घेतले.
त्याच्या प्राथमिक अहवालातून पाच महिलांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे दिसून आले. मात्र या महिलांचे आणखी ऍनलिसिस करून मागितले असून, त्याचाही अहवाल लवकरच येईल, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.
राज्याच्या आरोग्य विभागाने बेलसरसह जवळील कोथळे, वाळुंज, निळुज, खानवडी आणि पारगाव येथील सर्वच गर्भवती मातांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. आणखी काही टेस्टचे अहवाल पुढील काही दिवसांत येतील.