मुंबई – रोजच्या जीवनात अनेकजण सिनेमा पाहत असतात. परंतु एखाद चांगलं आणि रंजक नाटक पाहण्याची मजाच काही और असते. अशात नाट्यक्षेत्रातील मात्तबर जाणकारांसोबत युवा लेखक आणि दिग्दर्शकांची फळी काही नवं करू पाहते आहे. यात लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर हे नाव आघाडीवर आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या साथीने ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतविल्यानंतर आता पुन्हा ही जोडी ‘यू मस्ट डाय’ हे नवीन सस्पेन्स थ्रिलऱ नाटकं घेऊन प्रेक्षकांना भयचक्राचा गूढ अनुभव द्यायला सज्ज झाले आहेत.
या नाटकाचे लेखन नीरज शिरवईकर तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. प्रवेश आणि वरदा क्रिशन्स निर्मित ‘यू मस्ट डाय’ या नाटकाचा शुभारंभ १२ नोव्हेंबरला होणार आहे. नाटकाची निर्मिती अदिती राव यांनी केली आहे.जिेथे पारदर्शकता असते तिथेच काही गुपीतंही दडलेली असतात. अशाच एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणा-या व्यक्तीचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ ‘यू मस्ट डाय’ या नाटकात पहायला मिळणार आहे.
शर्वरी लोहकरे, सौरभ गोखले, संदेश जाधव, नेहा कुलकर्णी, अजिंक्य भोसले, हर्षल म्हामुणकर, प्रमोद कदम, विनिता दाते, धनेश पोतदार ही कलाकार मंडळी यात असणार आहेत. आपण जे पाहतोय त्यामागील खरं कारण काय आहे हे उलगडू न देणं हे खूप मोठं आव्हान सस्पेन्स थ्रिलर प्रकारामध्ये असतं. यातून हेच मोठं आव्हान आणि त्याचा थरार प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे.