लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. राज्यातील जनतेने १९८५ नंतर प्रथमच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपला सलग दुसऱ्यांदा संधी दिली. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला बहुमत दिले असल्याने लवकरच ३७ वर्षांचा पायंडा मोडत योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अशातच मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची आज (शुक्रवारी) पहिल्या टर्मची मुदत संपत असल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी योगी आदित्यनाथ हे लखनौ येथील राजभवनात दाखल झाले होते. येथे त्यांनी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. राज्यपालांनी यावेळी योगी आदित्यनाथ यांचे शाल व श्रीफळ देत स्वागत केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने पाच पैकी चार राज्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली असून या राज्यांतील सत्ता राखली आहे. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जबरदस्त मुसंडी मारत ९२ जागांवर विजय मिळवला.
४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशम विधानसभेध्ये भाजपला २५५ जागा मिळाल्या आहेत. मित्रपक्षांसह भाजपचे विधानसभेतील संख्याबळ २७३ इतके आहे. यावेळी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने देखील गतपंचवार्षिक निवडणुकांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. सपाला राज्यात १११ जागा मिळाल्या असून २०१७ मध्ये त्यांच्या खात्यात केवळ ४९ जागा होत्या. उत्तर प्रदेशातील जनतेने काँग्रेस व बहुजन समाज पक्षाला मात्र या निवडणुकांमध्ये सपशेल नाकारल्याचे पाहायला मिळाले.
#WATCH UP CM Yogi Adityanath tenders his resignation to Governor Anandiben Patel at Raj Bhavan in Lucknow pic.twitter.com/WM3TzqBwcF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 11, 2022