सुखी जीवनासाठी योगा

जगात सारे काही चालले आहे ते सुखासाठीच. सुख हे मानण्यावर असते असे म्हणतात. आपण करोडो रुपये संपत्ती कमावली; पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संपन्न जीवन शून्य होऊ शकतं. पैसा असून मनःशांती नाही. पैसा असून स्वास्थ्य नाही. ही परिस्थिती असमाधानाची. कारण मन शांत नाही. जीवनातील सर्वच दशा आणि दिशा मनावर अवलंबून असतात. जे मनी ते ध्यानी किंवा मनात ते जनात. ध्यानी ते स्वप्नी असं म्हणतात ते खरेच आहे.

सुख-दुःखाचे मूळ कारण मनच आहे. जसा सुदृढ राहण्यासाठी आपण व्यायाम करतो तसेच मन सुदृढ राहण्यासाठी मनाचा व्यायाम नियमित केला गेला पाहिजे. त्यासाठी प्राणायाम, योग आणि व्यायाम अशा तीन पायऱ्या आहेत.

प्राणायाम : प्राण म्हणजे त्राण, जीव जगण्याची शक्‍ती व व्यायाम म्हणजे जगण्यास वश करणारी किंवा नियंत्रित ठेवत दीर्घ आयुषमान वाढवण्याची शक्‍ती. आपल्या शरीरास ऑक्‍सिजनची नितांत आवश्‍यकता आहे. आपल्या शरीरातील सुक्ष्म व अतिसूक्ष्म मसल्स, पेशी व इतर सर्व घटकांना ऑक्‍सिजन म्हणजे प्राण वायूचीच आवश्‍यकता असते.

श्‍वसनातून प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम होय. या प्रक्रिया नासिकारंध्राद्वारे श्‍वास घेण्यावर विसंबून असतात. जर प्राणाची पातळी उत्तम असेल. त्या प्रवाहात लयता व सलगता, संथ आणि सहजता असेल तर त्याचे मन शांत, सकारात्मक, उत्साही व आनंदी राहते. त्या विषयी जागृतता व सजगता नसणे यामुळे शरीरातील नाडी व चक्रे यांच्यात अडथळा येतो. श्‍वसन अपूर्ण राहते. या सर्व बाबींमुळे तणाव, थकवा, असुरक्षितता, भीती या सारख्या गोष्टींचा प्रत्येय येऊ लागतो.

प्राचीन भारतीय आयुर्वेदात श्‍वसन प्रक्रिया व तिचे महत्त्व ते जाणून होते. कपालभाती, नाडीशोधन व भस्त्रिका हे प्राणायाम आहेत. यांच्या सतत व नियमित सरावाने नाडी, चक्रे व व्याधी यामधील अडथळे दूर होतात. यामुळे उत्साह, सकारात्मकता वाढीस लागते. मन शांत संयमी होऊन मन आत्म्यापर्यंत जाऊन पोहचते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले व केलेले प्राणायाम सुख समृद्धीची प्रचिती देते. मन व शरीर हलके भासू लागते.

योगासने : सुक्ष्म हालचालींवर नियंत्रण ठेवत शरीराला लवचिक, हलके व आतून सशक्‍त व मनाला शांत बनवण्यासाठी शरीराची कृती म्हणजे योगासने. अष्टांग योगामध्ये योगाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. काही योगाचे प्रकार मोक्ष, आनंद व आरोग्य मिळवण्यासाठी व शरीर अरोग्य करण्यासाठी केला जातो. योगाचे मुख्य सहा प्रकार आहेत.

राजयोग : प्राणायाम, नियम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी ह्या पतंजली योगाच्या आठ अंगास अष्टांग म्हणतात.

लययोग : यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असे लययोगाचे आठ अंग आहेत.

ज्ञानयोग : अशुद्ध आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे, हाच ज्ञानयोग किंवा यास ध्यानयोग असेही म्हणतात.

कर्मयोग : कर्म करणेच कर्मयोग व कर्मानेच आपल्यात कौशल्य आत्मसात करणे. हा त्यामागील खरा उद्देश व यास सहजयोगही म्हणतात.

हठयोग : षट्‌कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, ध्यान व समाधी. हठयोगीचा जोर हा आसन किंवा कुंडलिनी जागृतीसाठी आसन, बंध, मुद्रा व प्राणायमावर असतो. यास क्रियायोग म्हटले जाते.

भक्‍तियोग : भक्‍ती, स्मरण, कीर्तन, पादसेवन, अर्चन, दास्य, वंदन, आत्मनिवेदन व सौख्य असे नऊ गुण असणाऱ्या व्यक्‍तीला भक्‍त म्हणतात.

याशिवाय ध्यानयोग, सहज योग, क्रिया योग, कुंडलिनी योग, साधना योग, मुद्रायोग, मंत्रयोग व तंत्रयोग आदी प्रकार आहेत. पण वरील सहा प्रकार मुख्य असून योगाचे अनेक प्रकार त्यात सामावलेले आहेत. ते सर्व प्रकार मनुष्याच्या मनःशांती व आनंदमय जीवनाचे रहस्य बनून जातात.

व्यायाम : जगण्यासाठी जेवढे ऑक्‍सिजनचे व पाण्याचे महत्त्व आहे. तेवढेच व्यायामाचे महत्त्व आहे. प्राणायाम केल्याने मनावर ताबा मिळतो. मनाची चलबिचल थांबून स्थिरता येते. योगासनाने शरीरातील सर्वच अवयव क्रियाशील होतात. सकारात्मक जीवनाची सुरुवात होते. व्यायामाने स्फूर्ती, तन्यता व मसल्सला बळकटी वाढून दीर्घ आयुष्य लाभते. मरगळ व सर्व बिमाऱ्या दूर पळून जातात.

गांधीजी म्हणत असत, शरीर हेच धन आहे. त्याची किंमत सोन्याच्या नाण्याने भरून काढता येणार नाही. आनंदी सुदृढ व प्रफुल्लित जीवन म्हणजे प्राणायाम, योगा व व्यायाम यांनी परिपूर्ण जीवन. प्राणायाम प्राण भरतो. योगासने तनाव दूर करतात. व्यायाम शरीरास पूर्णतः बळकटी देतो. अशा परिपूर्ण शरीरात आनंद ओतप्रोत भरून ओसंडून वाहू लागतो. मनाच्या आनंदी अभ्यासात शरीराच्या कसरतीचा अभ्यास हा मुख्य भूमिकेत वावरत असतो आनंदी आनंद घेऊन.

आनंदी जगण्यातले काही तत्त्व :

एकाग्रता : शारीरिक व्यायामाने जशी शरीराची शक्‍ती वाढते. तसेच एकाग्रता ही मनाची शक्‍ती वाढवते. एकाग्रता ही वर्तमान स्थिती आहे. ती सुख व सफलतेची कुंजी आहे.

सकारात्मक विचार : प्रत्येक घटना सकारात्मक पद्धतीने बघण्याची सवय बनवली पाहिजे. संकटांना सकारात्मक व विकासाची संधी या दृष्टीने पाहिल्यास दुःखाची तीव्रता कमी होते. सकारात्मकता एक जीवन कवच बनते जे की इतरांनी सोडलेल्या नकारात्मक उर्जेपासून स्वतःचे स्वरक्षण करते.

मौन : मौन हा शारीरिक शक्‍तीतून मनाची शक्‍ती वाढवणारा उत्तम मार्ग आहे. प्रत्येक कृतीचे एक निश्‍चित उत्तर असते. सकारात्मक कृती सकारात्मक उत्तर व नकारात्मक कृती किंवा भाष्य नकारात्मक उत्तर असते. मौनामुळे हे टाळता येते. मौनामुळे मनुष्य आत्मिक विचारातून आत्मनिरीक्षण करून स्वतःत बदल घडवून आणू शकतो. आनंदी होऊ शकतो.

एकांत : मौनासोबत एकांत जर बाळगला तर आपल्या कामाचे सिंहावलोकन होऊन सकारात्मक जगण्याला आनंदी सुरुवात होऊ शकते. एकांत हा आनंदी मार्ग बनतो.

आत्मनिरीक्षण : मौन आणि एकांत ह्या आत्मनिरीक्षणासाठीचे मुख्य मार्ग आहेत. आपल्या दैनंदिन कामाचे बरे वाईट परिणाम आपणास लक्षात येतात. अशावेळी स्थिर मौन व एकांत धारण करून आत्मनिरीक्षण केल्यास आपल्यात सकारात्मक बदल होऊन आनंदी राहण्यास मदत होईल. सुखी जीवनाचे आनंदी मार्ग आपणास निश्‍चितच यशाकडे घेऊन जातील. आपले आहे आपणापाशी आपण का उदाशी? ह्या गोष्टी जेव्हा मनास कळू लागतात तेव्हा वरील सर्व मार्गाचा आवलंब यशस्वीतेने आनंदी मार्गावर मार्गक्रमण करण्याची चावी होईल.

– योगिता जगदाळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.