वय चोरी प्रकरणी बीसीसीआयची ‘या’ गोलंदाजावर कारवाई

रासिख सलामवर दोन वर्षांची बंदी

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने बुधवारी जम्मू आणि काश्‍मीरचा वेगवान गोलंदाज रासिख सलाम याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयचोरी प्रकरणात दोषी आढळल्याने रासिख सलाम याच्यावर बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. आयपीएल 2019च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये रासिख सलाम याला खेळण्याची संधी मिळाली होती.

या प्रकरणी बीसीसीआयने एक स्टेटमेंट प्रसिद्ध केले असुन त्यात त्यांनी नमूद केले आहे की, इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 भारतीय क्रिकेट टीममध्ये रासिख याच्या ऐवजी आता प्रभात मौर्या याला संधी दिली आहे. राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीने 21 जुलै पासून इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या अंडर-19 क्रिकेट टीममधून रासिखला वगळले आहे. आता रासिखच्या ऐवजी प्रभात मौर्या याची निवड करण्यात आली आहे. रासिख सलाम याने बनावट कागदपत्र जमा करत वयचोरी केल्याने त्याच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे.

बंदीची मुदत वाढवली

वयचोरी करुन अनेकदा खेळाडू टीममध्ये सहभागी होतात. मात्र, ही खूपच गंभीर बाब असल्याने अशा खेळाडूंवर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. यानुसार खेळाडूवर एका वर्षाची बंदी घालण्याची शिक्षा होती. मात्र, गेल्यावर्षी बीसीसीआयने या शिक्षेत वाढ करुन दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या नव्या नियमानुसार आता रासिख सलाम याच्यावर दोन वर्षांची बंदी बीसीसीआयने घातली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.