खातेदार ग्राहकांना होतोय मनस्ताप
यवत- यवत (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे एटीएम गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने खातेदार ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे एटीएम सेंटर असून अडचण नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
यवत हे मध्यवर्ती व पुणे – सोलापूर महामार्गाच्या लगत असलेले बाजारपेठेचे गाव आहे. येथील जिल्हा बॅंकेच्या खातेदार ग्राहकांची संख्या वीस हजारांच्या आसपास आहे. खातेदार ग्राहकांची बॅंकेत गर्दी होऊ नये तसेच त्यांना विनाविलंब पैसे मिळावे या उद्देशाने जिल्हा बॅंकेच्या शेजारीच एटीएम सेंटर उभारले आहे. मात्र हे एटीएम सेंटर सतत बंद असते.
गेल्या दहा दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे, मात्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व बॅंका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एटीएम सेंटर बंद असल्याने बॅंकांमध्ये नागरिकांची पैसे काढण्यासाठी गर्दी पहावयास मिळत आहे. तर एटीएम सेंटर बंद असल्यामुळे बॅंकांना सुटीच्या काळात खातेदार ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बंद असलेले एटीएम सेंटर लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.