बेल्हे – जुन्नर तालुक्यातला रखडलेला यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प पूर्णत्वास नेणार आहे. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार अतुल बेनके दिली. राजुरी (ता. जुन्नर) येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर व ग्रामपंचायत राजुरी यांच्या वतीने गायींच्या बाजाराचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
बेनके म्हणाले की, चिल्हेवाडी बंद पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. राजुरीत गायींचा आठवडे बाजार सुरू झाला आहे. परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. माजी आमदार सोनवणे म्हणाले की, सध्या दुधाला चांगला असा बाजारभाव मिळत असला तरी गवळ्यांना कष्टाप्रमाणे बाजार मिळत नसल्याने गवळ्यांपुडे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती संजय काळे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात अग्रेसर असलेले गाव आहे. गावात सुमारे सहा ते सात हजार गायी व दोन ते तीन हजार म्हशी आहेत. एकच दूध संस्था असून एकच दुग्ध व्यवसाय संस्था आहे. सुमारे दोन ते अडीच हजार दूध उत्पादक गवळी आहेत. दररोज चाळीस हजार लिटर दूध संकलन होत आहे. दूध उत्पादक जास्त असल्याने नवीन संकरीत गायी खरेदी करून दुग्धव्यवसाय भरभराटीला आणला जात आहे. शेतीला उत्तम जोड व्यवसाय करून उत्पन्न वाढलेले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष, संचालक बाळासाहेब खिल्लारी, माजी सभापती दीपक औटी, धोंडीभाऊ पिंगट आदी मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य बाळासाहेब औटी, निवृती काळे, राजुरी गावचे सरपंच एम. डी. घंगाळे, माजी सरपंच माऊली शेळके, वैशाली औटी, गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष गोविंद औटी, वल्लभ शेळके, शिवाजी हाडवळे, नरेंद्र गटकळ, सुदाम औटी, एकनाथ शिंदे, सतीश औटी, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ, बाजार समितीचे सर्व संचालक, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी, पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच एम. डी. घंगाळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन माजी सरपंच संजय गवळी यांनी केले. माजी सरपंच एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.
डेन्मार्क प्रजातीच्या गायीला 2 लाख 21 हजारांची विक्रमी विक्री
राजुरी येथे नवीनच सुरू झालेल्या गायींच्या आठवडे बाजारात एच. एफ. डेन्मार्क प्रजातीची गायींची उच्चांकी अशी दोन लाख 21 हजार रुपयांला विक्री झाली आहे. व्यापारी बापू पानसरे यांच्याकडून ही गाय शेतकरी किरण जाधव यांनी विकत घेतली. पहिल्याच दिवशी एकूण दहा गायींची विक्री होऊन पाच लाख 37 हजार तीनशे रुपयांची विक्री झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे व आळेफाटा प्रमुख प्रशांत महाबरे यांनी दिली.