पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज येत्या दि.3 ऑक्टोबरपासून भरता येणार आहेत.
राज्य मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शाळा, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि.3 ते 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्पपरीक्षार्थी, पूर्वी नाव नोंदणी प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी दि.24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी दि.1 ते 8 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. चलनाद्वारे बॅंकेत शुल्क जमा करण्यासाठी दि.1 ते 18 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आलेली आहे. महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी दि.19 नोव्हेंबरची मुदत आहे.
विद्यार्थ्यांची माहिती अचूक असल्याची खात्री करुनच विद्यार्थ्यांच्या याद्या जमा कराव्यात, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.
शुल्क माफीसाठी महत्त्वाची सूचना
राज्य शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा फी माफी देण्यासाठी विद्यार्थ्यांचे महसूल मंडळ, गाव, तालुका व जिल्ह्याची तसेच विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या बॅंक खात्याची माहिती विभागीय मंडळानी जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे माहिती सादर करणे आवश्यक आहे.