बीजिंग – चीनला कोणतीही विदेशी शक्ती धमकावू, विरोध करू अथवा अंकित करू शकत नाही, अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले आहे. चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेची शताब्दी साजरी करण्यासाठी ऐतिहासिक तियान्मेन चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभामध्ये ते बोलत होते.
कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दी समारंभासाठी या ठिकाणी अतिभव्य मंच उभारला गेला असून त्यावर “पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’चे संस्थापक माओ त्से-तुंग यांचा अतिभव्य फोटो लावण्यात आला आहे.
जिनपिंग यांनी आपल्या भाषणामध्ये “कोणतीही विदेशी शक्ती’ असे म्हणून अमेरिकेला गर्भीत इशारा दिला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन या दोघांनीही चीनविरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. व्यापार, मानवी हक्क आणि कोवि-19 विषाणूची उत्पत्ती आदी विषयांवरून अमेरिकेने वारंवार चीनला लक्ष्य केले आहे.
चीनला धमकावणे, विरोध करणे आणि अंकित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही विदेशी शक्तीला 1.4 अब्ज चिनी नागरिकांच्या विराट भिंतीला धडक द्यावी लागेल, असे जिनपिंग म्हणाले. चीननेही कधीही कोणत्याही देशाला धमकावले नाही, विरोध केलेला नाही आणि अंकित करण्याचाही प्रयत्न केलेलाही नाही, असेही ते म्हणाले. पक्षात भेद निर्माण करणाऱ्या विषाणूंना उखडून टाकले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे रक्षण करण्यासाठी चीनला आधुनिकीकरणाचा स्वीकार करावा लागणार आहे. लष्कराचे आधुनिकीकरण करावे लागेल हा आपला जुनाच आग्रह त्यांनी कायम ठेवला आहे. जिनपिंग यांनी आपल्या भाषणामध्ये माजी प्रमुख नेत्यांचा उल्लेख केला आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. माओ यांच्यानंतर तहहयात अध्यक्ष बनणारे जिनपिंग हे चीनचे सर्वात ताकदवान नेते बनले आहेत.
या समारंभाला उपस्थित असलेल्या पार्टीच्या 70 हजार कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थ्यांनी जिनपिंग यांच्या तासभराच्या भाषणानंतर त्यांचा जयजयकार केला.
विमानांची मानवंदना
समारंभापूर्वी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांनी उपस्थितांना मानवंदना दिली. एकूण 71 विमाने यामध्ये सहभागी झाली होती. कम्युनिस्ट पार्टीचे काही माजी ज्येष्ठ नेते समारंभाला उपस्थित होते. माओ यांनी 1 जुलै 1921 रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची स्थापना केली होती. 1949 साली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापना झाल्यापासून हा पक्ष सत्तेत आहे.