मेलबर्न – चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती शी जिनपिंग यांची जागा मजबूत करण्यासाठी एक “ऐतिहासिक प्रस्ताव’ मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावात पक्षाच्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासाचा सारांश, पक्षप्रमुखांची कामगिरी आणि भविष्यातल्या दिशांची चर्चा केली गेली आहे.
कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाल्यापासून अशा प्रकारचा प्रस्ताव फक्त तिसऱ्यांदा पारित झालेला आहे. सगळ्यात पहिला प्रस्ताव माओ त्से तुंग यांनी 1945 साली आणि दुसरा प्रस्ताव देंग शियाओपिंग यांनी 1981 मध्ये पारित केला होता. यानंतर आता गुरुवारी, 11 नोव्हेंबरला पक्षाच्या सहाव्या महाअधिवेशनात तो पारित करण्यात आला आहे. या अधिवेशनाला चीनच्या सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांपैकी एक मानले जात आहे.
अशा तऱ्हेचा प्रस्ताव पारित करणारे शी जिनपिंग चीनचे फक्त तिसरे नेते ठरले आहेत. पक्षाने हे पाऊल उचलण्याचा उद्देश शी जिगपिंग यांना पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग आणि त्यांचे उत्तराधिकारी देंग शियाओपिंग यांच्या समतुल्य उभ करणे आहे.
मागच्या दोन प्रस्तावांप्रमाणेच, हा प्रस्तावही पक्षाचे सिद्धांत, इच्छाशक्ती आणि कृती यांना एकत्रित करण्यात मोलाची भूमिका बजावेल. यामुळे भविष्यातली प्रगती निश्चित करता येईल, असे कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ अधिकारी क्यू क्विंगशान यांनी म्हटले आहे.
याआधी 2018 साली राष्ट्रपती पदासाठी दोन कार्यकाळांची निर्धारित सीमा मागे घेतली होती. यामुळे शी आता आजीवन आपल्या पदावर कायम राहू शकतात.
सत्तेवरील पकड मजबूत
हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे चीनच्या सत्तेवर शी यांची पकड मजबूत होणार आहे. चीनमधील न्यूजलेटर चाईन नीकनचे संपादक ऍडम नी म्हणाले की, “चीनच्या आजवरच्या प्रवासातील नायक म्हणून शी जिगपिंग स्वतःला स्थापित करू इच्छितात. या ऐतिहासित प्रस्तावाला पुढे करत त्यांनी स्वतःला पक्ष आणि आधुनिक चीनच्या भव्य गाथेत जागा निर्माण केली आहे. हा प्रस्ताव त्यांचा स्वतःला सत्तेत कायम ठेवण्यासाठी मार्ग आहे.