WTC Final 2023, IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा (World Test Championship Finals) अंतिम सामना भारत (Team India)आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सर्व बाद 296 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे आता 173 धावांची आघाडी झाली आहे.
भारताकडून पहिल्या डावात फलंदाजीत अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 आणि शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या तर रवींद्र जडेजानेही 48 धावा केल्या आहेत. भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार रोहित शर्मा 15 धावा, शुभमन गिल 13 धावा, चेतेश्वर पुजारा 14 धावा, विराट कोहली 14 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात गोलंदाजीत पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. स्कॉट बोलँड, कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नॅथन लायनने एक विकेट घेतली.
अंतिम सामन्याचा अजून अडीच दिवसांचा खेळ बाकी आहे. अशा स्थितीत दुसऱ्या डावात चांगली धावसंख्या उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाला चौथ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करू शकतो. त्याचबरोबर कांगारू संघाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने शतके झळकावली. ट्रॅव्हिस हेड 163 धावांवर बाद झाला. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले. तो 121 धावा करून बाद झाला. डेव्हिड वॉर्नरने 43 आणि मार्नस लबुशेनने 26 धावा केल्या.कॅमेरून ग्रीन सहा धावांवर, अॅलेक्स कॅरी 48 धावांवर, मिचेल स्टार्क पाच धावांवर, पॅट कमिन्स नऊ धावांवर आणि लियॉन नऊ धावांवर बाद झाला.
भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.