वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र या आजाराची लागण होणारे ट्रम्प एकमेव नेते नाहीत. जगभरातील किमान एक डझन देशांच्या प्रमुखांना करोनाचा झटका बसला आहे. त्यातून बहुतेक नेते बरे झाले आहेत. मात्र राष्ट्रप्रमुखही करोनाच्या धोक्यापासून सुरक्षित नाहीत असा संदेश यातून मिळालेला आहे.
ब्रिटन: पंतप्रधान बोरिस जॉन्सन-
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मार्च महिन्यात करोनाची लागण झाल्यावर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरेच दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. बरे झाल्यानंतर त्यांनी रूग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. युरोपात करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे जॉन्सन यांच्या सरकारने पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू केले आहेत.
ब्राझील: राष्ट्रपती जायर बोल्सनारो-
ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही करोनाची लागण झाली होती व त्यातून ते आता बरे झाले आहेत. त्यांनी करोनाबाबत जी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यांचे पालन केले नव्हते. अनेक कार्यक्रमांत त्यांनी मास्क न लावताच हजेरी लावली होती. सगळे नियम धाब्यावर बसवून त्यांनी सभा घेतल्या होत्या आणि समर्थकांशी हस्तांदोलनही करत होते. त्यामुळे त्यांनाही लागण झाली व दोन आठवड्यांच्या उपचारांनंतरच ते पूर्ण बरे झाले आहेत. करोनामुळे मरण पावलेल्यांच्या यादीत अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्सनारो 65 वर्षांचे आहेत.
होंडुरस: राष्ट्रपती जुआन हर्नांडिस-
हर्नांडिस यांनी जून महिन्यात त्यांची पत्नी आणि काही सहकाऱ्यांसमवेत करोनाची चाचणी केली होती. त्यात ते पॉझिटिव्ह आले होते. चाचणीनंतर त्यांना काही दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती व त्यांना ऑक्सिजनही द्यावा लागला होता. मात्र नंतर त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली.
मोनॅको: प्रिन्स अल्बर्ट द्वितीय-
ब्रिटनच्या प्रिन्स चार्लस यांच्याप्रमाणेच मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट यांनाही करोना झाला होता. किंबहुना करोनाची लागण होणारे ते पहिले राष्ट्रप्रमुख ठरले. 19 मार्च रोजी त्यांना लागण झाली होती व तसे पत्रक जारी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू केले गेले.
रशिया: पंतप्रधान मिखाईल मिशुुस्टिन-
जानेवारी महिन्यात रशियाच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळणारे 54 वर्षीय मिशुस्टिन यांना एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. रूग्णालयात दाखल केल्यानंतर दोन आठवड्यांच्या विलगीकरणानंतर ते करोनामुक्त झाले.
जर्मनी: चान्सेल अँजेला मार्केल-
जर्मनीच्या लोकप्रिय नेत्या चान्सेलर अँजेला मार्केल यांनीही करोनावर यशस्वी मात केली आहे. 66 वर्षीय मार्केल यांनी करोनाची लागण झाल्यानंतर स्वत:ला विलगीकरणात ठेवले होते व उपचारांती त्या पूर्ण बऱ्या झाल्या.
कॅनडा: पंतप्रधान जस्टिीन ट्रुडो –
कॅनडाचे 48 वर्षीय पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली होती. त्यांना कोणतीही बाह्य लक्षणे नव्हती. मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन आठवडे विलगीकरणात राहुन नंतर त्यांनी कामाला सुरूवात केली.