पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास प्रशासनाची परवानगी; राहुल व प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना

नवी दिल्ली – हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या या घटनेविरोधात देशभरात ठिकठिकाणी प्रदर्शने होत आहेत. अशातच आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पुन्हा एकदा बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे निघाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार राहुल व प्रियंका गांधी यांच्यासमवेत शेकडो काँग्रेस कार्यकर्ते हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा उड्डाणपुलानजीक रोखले होते.

यानंतर पोलिसांनी राहुल, प्रियंका गांधी यांच्या ताफ्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली-नोएडा उड्डाणपुलावरून पुढे सोडले असून ते आता हाथरसकडे रवाना झाले आहेत.


तत्पूर्वी, गुरुवारी राहुल गांधी व प्रियंका गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघाले असता त्यांना यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते तोल जाऊन खाली पडले होते.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करत ते आक्रमक पवित्र्यात असल्याचे संकेत दिले होते. ट्विटद्वारे त्यांनी, “हाथरसच्या दु: खी कुटूंबाला भेटून त्यांचे दु: ख वाटून घेण्यापासून जगातील कोणतीही शक्ती मला रोखू शकत नाही. ” असा संदेश दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.