परभणी – देशात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. डॉक्टर असो वा नर्स किंवा राजकारणी सर्वच क्षेत्रातील लोक करोनाचा बळी ठरत आहे. परभणीत ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा करोनाने मृत्यू झाला आहे. डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या राहुल पवार याची करोनाविरुद्धची लढाई आजअखेर संपुष्टात आली.
महिन्याभरापासून सुरू असलेली करोनासोबतच्या लढ्यात राहुलला अपयश आलं आहे. त्यानं आज सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. घरातील गरीब परिस्थितीपुढे कधीही हार न मानणारा राहुल करोनासमोर हरल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
परभणीच्या पाथरी येथील आनंद नगर तांड्यावर राहणारा डॉक्टर राहुल पवार आपल्या आई वडिलांना उसतोड कामात मदत करायचा. राहुलला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्याला म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला होता. मागील एक महिन्याहून अधिक कालावधीपासून तो औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता.
राहुल याची घरची परिस्थिती बिकट असल्यानं त्याच्या उपचारासाठी मित्रांनी आणि महाविद्यालयाने निधीही उपलब्ध करून दिला होता. पण त्याची करोनाशी लढाई अपयशी ठरली आहे.