नवी दिल्ली – पुढील दोन वर्षात देशातील पंधरा हजार महिला बचत गटांना कृषी वापरासाठीचे ड्रोन दिले जाणार आहेत. त्यासाठीच्या 1261 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
या योजनेचे उद्दीष्ठ पुढील दोन वर्षात 15 हजार निवडक महिला स्वयंसहायता गटांना शेतीच्या उद्देशासाठी शेतकऱ्यांना भाड्याने सेवा देण्यासाठी ड्रोन पुरवण्याचे आहे,असे ठाकूर म्हणाले. त्यातून महिला बचत गटांना शाश्वत व्यवसाय मिळेल आणि ते गट अतिरीक्त उत्पन्न मिळवू शकतील असा मंत्र्यांचा दावा आहे. ग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराच्या आधारे महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे असे ते म्हणाले.