पुणे (संजय कडू ) – वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनवरील पोलीस कर्मचारी आणि वाहन उचलणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनाचा वाहनचालकांना अनेकदा वाईट अनुभव येतो. यातूनच वाहनचालक सातत्याने पुणे वाहतूक पोलिसांच्या कारभारावर टीका करत असतात. ही टीका आता व्टीटर, इन्स्टाग्राम आणि टेलीग्रामवरही होऊ लागली आहे. याची दखल वाहतूक शाखेने गांभीर्याने घेतली आहे. वाहनचालक आणि टोइंग व्हॅनवरील कर्मचारी यांच्यातील संघर्ष टाळून वाहतूक शाखेची प्रतिमा सुधारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यासाठी आता सर्वच टोइंग व्हॅनवर महिला पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहे. जेणे करुन महिला कर्मचारी पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणे अरेरावी करणार नाहीत आणि सभ्य भाषा वापरतील, असा वाहतूक शाखेचा होरा आहे.
“नो पार्किंग’मधील वाहने उचलण्यावरुन नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतात. काही वेळा एकमेकांशी भांडणाबरोबरच हात उगारण्यापर्यंत प्रकरण पोहचते. पोलिसांच्या सोशल मीडिया साइट्सवर लक्ष ठेवणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दै. “प्रभात’ला सांगितले, पोलिसांची टोइंग व्हॅन मोटारसायकल किंवा कार “नो पार्किंग’मध्ये दिसताच वाहनांना जॅमर लावते किंवा टोइंग करून उचलून नेते. वाहन सोडवण्यास आलेल्या वाहनचालकास तातडीने दंड भरण्यास सांगितले जाते. मात्र अनेकदा काही कारणांमुळे वाहनचालक तातडीने दंड भरु शकत नाही. तो सुरुवातीला विनंती करतो. यानंतर परिसरात “नो पार्किंग’ची कोणतीही चिन्हे पाहिली नाहीत, दोन मिनिटांचेच काम होते, अशी कारणे सांगितली जातात. कधीकधी ही कारणे खरीही असतात. मात्र पोलीस कर्मचारी आणि टोइंगचे कर्मचारी काहीही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसतात. यामुळे संघर्ष वाढत जातो. यामुळे वाहतूक पोलिसांची प्रतिमा कायमस्वरुपी नागरिकांच्या मनात नकारात्मक बनते.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त (वाहतूक) विजय मगर यांनी सांगितले की, सोशल मीडियावर, विशेषत: टोइंग व्हॅन किंवा क्रेनवर वाहतूक पोलिसांच्या असभ्य वर्तनाशी संबंधित अनेक तक्रारी पाहिल्यानंतर, आम्ही गांभीर्याने काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही तातहीने टोइंग व्हॅन आणि क्रेनवर महिला पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरील “नो पार्किंग’मध्ये उभी असलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलीस 15 टोइंग व्हॅन आणि तेवढ्याच क्रेनचा वापर करतात. याचा परिणाम लगेचच दिसून आला आहे. मागील दोन आठवड्यांत आम्हाला ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांची विशेषतः टोइंग व्हॅन आणि क्रेनवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची असभ्य वर्तनाची तक्रार प्राप्त झालेली नाही.
महिला ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले की, “गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मला पूर्वी चौकात नियुक्त करण्यात आले होते. मात्र, अचानक मला टोइंग व्हॅनवर ड्यूटी करण्यास सांगण्यात आले आणि मला नम्रपणे बोलण्यास सांगण्यात आले. मी माझ्या वरिष्ठांच्या सर्व सूचनांचे पालन केले आणि आतापर्यंत माझ्याशी दंडाच्या मुद्द्यावर कोणीही वाद घातला नाही.
सौजन्य अन् सहकार्यही
आम्हाला प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये मेडिकल तसेच दवाखान्यात गेलेल्या वाहनचालकांवर कोणतीही दयामाया न दाखवता दंड आकारला जात होता. अनेकदा वाहनचालक रस्त्त्याच्या कडेला वाहन लावून मेडिकलमधून औषधे घेऊन काही मिनिटांत परतत होते. त्यांनाही वाहतूक पोलिसांनी सोडले नव्हते. यामुळे औषध दुकाने आणि रुग्णालयांसमोर काही मिनिटांसाठी वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांना दंड करू नये, असे आदेश दिले असल्याचे मगर यांनी सांगितले.