पुणे – महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बिटक्वॉईनमध्ये गुंतवणूक करणे तसेच इतर कारणांसाठी तीच्या नावे कर्ज काढून 11 लाख रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केलेल्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.ए. अरगडे यांनी दिला.
रोनित डी.कपूर उर्फ संदिप दादाराव वायभासे (वय 34, रा. वडगांव शेरी, मुळ बोरखेडी, ता. रिसोड, जि. वाशिम )असे कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर 2017 ते डिसेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.
वायभासे याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक करणे, सिंगापूर येथे नोकरी मिळविणे यासाठी फिर्यादीचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापर करीत 11 लाख रूपयांचे कर्ज उचलून फसवणूक केली. त्यानंतर घेतलेले पैसे परत करणार नसल्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा वापर कशासाठी केला, विविध खासगी बॅंकामधून फिर्यादी महिलेच्या नावे वैयक्तिक कर्ज काढण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली आहे, त्याचा तपास करणे, त्याने वेळोवेळी भेटलेल्या मित्रांना फिर्यादी या त्यांच्या होणाऱ्या पत्नी आहेत, अशी ओळख करून दिली होती. त्या अनुषंगाने मित्रांकडे तपास करायचा असल्याचे पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.