हडपसर – उर्वरित २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असून अंतिम अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे प्रदीर्घ विलंबानंतर अखेर २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत.
पुणे महापालिकेत समावेश झालेल्या ११ गावांतील सरकारी दवाखाने, शाळा, पाणी पुरवठा योजना, अंगणवाड्या, अधिकारी व कर्मचारी यांना महापालिकेत वर्ग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या.
त्याचवेळी नव्याने समावेश होणाऱ्या २३ गावांतील यंत्रणाही महापालिकेत सामावून घेण्यात येईल; मात्र त्याची कार्यवाही अधिसूचना निघाल्यानंतर होणार आहे. असेही पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यास काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच आज दुपारी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असून अंतिम अधिसूचना निघाली आहे. अधिसूचना निघाल्यानंतर उर्वरित २३ गावे खऱ्या अर्थाने महापालिकेत समाविष्ट होण्यावर शिक्कामोर्तब झाले.
ही गावे होणार समाविष्ट
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.