कॅनबेरा – कोरोनाला रोखण्याचा लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने जगभरात कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. तरीही काही लोकांना ही लस घेण्याची भीती वाटते. त्यामुळेच काही देश आपल्या नागरिकांना जागरूक करण्यासाठी काही आकर्षक ऑफर्सही देत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियातून एक प्रकरण समोर आले आहे जिथे लस घेतल्यामुळे एका तरूणीचे नशीब बदलले आहे. तरूणी कोरोनाची लस घेऊन करोडपती झाली आहे.
– अशी लागली करोडोंची लॉटरी
‘द ऑस्ट्रेलियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ‘द मिलियन डॉलर वॅक्स कॅम्पेन’ सुरू आहे. यात जोआन झू नावाच्या तरूणीला एक मिलियन डॉलरची लॉटरी लागली आहे. याची भारतीय चलनात सुमारे 7.4 कोटी रुपये एवढी किमत होते. जोआन ही त्या लाखो ऑस्ट्रेलियन लोकांपैकी एक आहे ज्यांनी सरकारच्या विनंतीवरून कोरोनाची लस टोचून घेतली आणि लकी ड्रॉमध्ये ते करोडपती बनले.
जोआन यांना हे बक्षीस केवळ ऑस्ट्रेलिया सरकारनेच नव्हे तर तेथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थांनी दिले आहे. लोकांमध्ये लसीकरण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर द मिलियन डॉलर वॅक्स अलायन्सच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
– 30 लाख लोकांमध्ये जोआन भाग्यवान
अहवालानुसार, जोआनसह या लकी ड्रॉमध्ये सुमारे 30 लाख लोक सहभागी झाले होते. लस घेण्यापूर्वी, जोआनला माहिती नव्हते की ती दुसऱ्या दिवशी सकाळी उठेल तेव्हा करोडपती झाली असेल. ही लॉटरी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तिला पहिल्यांदा फोन केला तेव्हा जोआनने फोनही उचलला नव्हता.
– जोआन भविष्यासाठी करेल गुंतवणूक
मीडियाने जोआनशी संवाद साधला असता ती म्हणाली, लकी ड्रॉचा चेक मिळाल्यानंतर ती कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू देईल आणि तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करेल. तसेच जोआनने असेही सांगितले की जर चीनने नवीन वर्षासाठी सीमा उघडली तर तिला तिच्या कुटुंबासह प्रथम श्रेणीचे तिकिट काढून हवाई प्रवास करायचा आहे आणि ती एक पंचतारांकित हॉटेल बुक करेल.