नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये छपाईच्या कागदावर लावण्यात आलेले 10 टक्के सीमा शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी “इंडियन न्यूजपेपर सोसायटी’च्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. सोसायटीचे अध्यक्ष आणि मल्याळा मनोरमा समुहाचे कार्यकारी संपादक जयंत माम्मेन मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये दैनिक जागरणचे महेंद्र मोहन गुप्ता आणि बेनिट कोलमन लिमिटेडचे मोहित जैन हे या बैठकीला उपस्थित होते.
तत्पूर्वी कागदावरील सीमा शुल्काचा बोझा वर्तमानपत्रांना पेलवण्यासारखा नसल्याचे सांगून “इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ने हे सीमाशुल्क मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र देशांतर्गत कागद उत्पादनाला चालना देण्याच्या हेतूने आयात केलेल्या वृत्तपत्र कागदावर 10 टक्के सीमाशुल्क लावण्यात आले आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मागणीस नकार देताना सांगितले होते.