पुणे {प्रभात वृत्तसेवा} : भिमाजी साबळे हा अर्थ केम लॅबेरोटरी कंपनीचा मालक आहे. केमिकल इंजिनीअर युवराज भुजबळच्या मदतीने मेफेड्रोनचा फार्मुला आणि कच्चा माल तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. कुरकुंभ येथे मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी जे एम चौहान यांनी २९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
भिमाजी परशुराम साबळे (वय-४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा, अहमदनगर) , युवराज बब्रुवान भुजबळ (वय-४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून मेफेड्रोन तयार केले, तसेच मेफेड्रोन कोणाला दिला आहे, किती तयार केला, मेफेड्रोनची निर्मिती करण्यासाठी लागणार कच्चा माल कोठून आदी तपास करायचे आहे.
तसेच साबळे आणि भुजबळ यांनी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनची निर्मिती केली असून साथीदारामार्फत भारतातील वेगवेगळ्या शहरणांमध्ये पाठविला आहे. तसेच हे आरोपी इतर आरोपींच्या कसे संपर्कात आले आहेत याची चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली होती.