दौंड-येथील महवितरणच्या वायरमनला 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुभाष सदर शेळके (वय 37, रा. गोपाळवाडी रोड, दौंड) यांनी येडेवाडी (ता. दौंड) येथील शेतीपंपासाठी नवीन इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मर बसविलेच्या बदल्यात मोबदला म्हणून वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज (दि. 6) सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वीस हजार रुपये लाचेची रक्कम शहरातील भाजी मंडई येथील रस्त्यावर स्वीकारताना सुभाष शेळके यास लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक एस. व्ही बिले करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार मारुती हिरवे यांनी दिली.
दरम्यान मागील दहा दिवसांत दुसऱ्या व्यक्तीस लाचलुचपत विभागाने महावितरण विभागाच्या कार्यालयातून रंगेहात पकडले आहे. या दहा दिवसांत घडलेल्या दोन घटनांमुळे मागील काही दिवसांमध्ये महावितरणमध्ये खाऊगिरी चर्चा सुरू होते. याला आता दुजोराच मिळाला आहे. मात्र यावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना यातून काही बोध घेण्यास शिकतील की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून आता वरिष्ठांनी अशा प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.