पिंपरी – आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “आमदार चषक ढोल-ताशा’ स्पर्धेत दापोडी येथील नवचैतन्य तरुण मंडळाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या निमित्ताने ढोल-ताशांचा दणदणाट शहरवासियांना पहायला मिळाला. महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनतर्फे भोसरीत आमदार चषक ढोल झांज स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बाळासाहेब पवळे, कालिदास लांडगे, संतोष लांडगे आणि अशोक शेडगे यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. स्पर्धेत एकूण 17 पथक सहभागी झाले होते. यासह “जॉब फेअर’, खेळ रंगला पैठणीचा आदी कार्यक्रम देखील राबविण्यात आले.
या स्पर्धेत नवचैत्यन्य तरुण मंडळ, दापोडी पथकाने आमदार चषकाचे मानकरी व प्रथम क्रमांक पटकावला. भैरवनाथ तरुण मंडळ, बोरज मावळ यांनी द्वितीय क्रमांक, रासाई तरुण मंडळ, वडगाव, शिरुर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, श्री भैरवनाथ तरुण मंडळ, काले मावळ चौथा, दत्त मंदिर, तरुण मंडळ, खडकी यांनी पाचवा, जय भवानी तरुण मंडळ, दिघी यांनी सहावा, सह्याद्री क्रीडा मंडळ, दिघी यांनी सातवा, कानिफनाथ तरुण मंडळ आढले, मावळ यांनी आठवा क्रमांक, भैरवनाथ तरुण मंडळ शिवणे, मावळ यांनी नववा आणि दहावा क्रमांक श्रीराम तरुण मंडळ, धनगव्हन मावळ यांनी पटकावला आहे.
वैयक्तिक पारितोषिकमध्ये शिस्तबद्ध संघ दत्त मंदिर तरुण मंडळ, उत्कृष्ठ ढोलवादक विशाल दहिभाते, उत्कृष्ठ ताशावादक मनोज धारवाड, उत्कृष्ट घंटावादक राम जाधव, उत्कृष्ट झांज वादक जानव्ही वाळके यांना प्रदान करण्यात आले. बालकलाकार अर्णव परांडे यांना उत्कृष्ट ताशावादक पुरस्कार दिला. सूत्रसंचालन सतीश काकडे, गणेश लांडगे यांनी केले. पंच म्हणून अक्षय लांडगे, आशिष लांडगे, रोहिदास फुगे, रविंद्र यादगिरी यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाबरोबरच दिघी येथे आयोजित “जॉब फेअर’मध्ये एका दिवसात 889 युवकांना नोकरीची संधी मिळाली. माजी नगरसेवक विकास डोळस, शहर चिटणीस कुलदीप परांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी येथे माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने आकाश फल्ले प्रस्तुत “खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रथम क्रमांकासाठी फ्रिज, द्वितीय गॅस शेगडी, मिस्कर टेबल फॅन यासह मानाची पैठणी आणि भेटवस्तू पुरस्कारस्वरुप देण्यात आले. या वेळी उद्योजक निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव, सोनम जांभूळकर, ऍड. महेश लोहारे आदी उपस्थित होते.