पुणे – “मी आपला इथेच बरा…, असा संदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाढवा मेळाव्यात मशिदींसमोरील भोंग्याच्या समोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. या आदेशावरून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. या आदेशानंतर प्रभागात बहुतांश मुस्लीम मतदार असल्याने मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपण प्रभागात शांतता ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यांवर पक्षाचे माजी शहराध्यक्ष अजय भोसले आणि राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी प्रश्न उपस्थित करत मोरे यांच्यावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर, नाराज असलेले मोरे राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा बुधवारी दिवसभर शहरातील राजकीय वर्तुळात होती.
मात्र, मोरे यांनी माध्यमांसमोर येत मी मनसे सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करत “पार्ट टाइम’ राजकारण करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये, अशी टीका पक्षातील पदाधिकाऱ्यांवर केली आहे. मनसेच्या मेळाव्यानंतर पुण्यात मनसेचे दोन्ही नगरसेवक या घोषणेमुळे अडचणीत आल्याची चर्चा होती. त्यानंतर मोरे यांनी प्रभागात शांतता ठेवण्यास आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मोरे अप्रत्यक्ष ठाकरे यांचा आदेश धुडकावत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर भोसले आणि संभूस यांनी पत्रकार परिषद घेत मोरे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. त्याला मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मोरे यांनी व्हॉटसअप स्टेटसवर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ठेवून मी इथेच बरा, असे सांगत मनसे सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
पार्ट टाइम काम करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकू नये. कालपासून मला सर्वच पक्षाच्या ऑफर आल्या आहेत. पण, मी कोणाकडेही जाणार नाही. मी मनसेचे काम करणार आहे. – वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे