प्रशासकांच्या निर्णयाला आडत्यांची केराची टोपली
पुणे – बाजार समिती प्रशासनाने 2007 च्या निर्णयानुसार महिनाभरासाठी प्रत्येक गाळ्यावर मूळ गाळेधारक आडत्याला एक दिवाणजी आणि एक मदतनीस, अशा दोनजणांना अतिरिक्त कामावर ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दोन दिवसांतच प्रशासकांच्या या निर्णयाला आडत्यांनी केराची टोपली दाखविली आहे.
रविवारी बाजारात अनेक गाळ्यांवर डमी आडत्यांची संख्या जास्त होती. बाजार समितीने कारवाई केली असली, तरी प्रशासकांच्या निर्णयाला आडते जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्केट यार्डात बेकायदा किरकोळ विक्री करणाऱ्या आडत्यांच्या डमींवर समितीने 18 तारखेपासून 230 आडत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंडापोटी 4 लाख 50 हजार रुपये दंड वसूल केला. दि.26 रोजी पणन संचालक किशोर तोष्णीवाल बाजार समितीत आले असता आडत्यांनी त्यांची भेट घेत बदलत्या व्यापाराचे कारण पुढे करीत अतिरिक्त डमी आडते ठेवण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. पणन संचालकांनी हा निर्णय प्रशासकांवर सोपविला. त्यानुसार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत 2007 च्या निर्णयानुसार महिनाभरासाठी प्रत्येक गाळ्यावर मूळ गाळेधारक आडत्याला एक दिवाणजी आणि एक मदतनीस, अशा दोन जणांना अतिरिक्त कामावर ठेवण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. महिनाभरात डमी आडते आणि बाजारातील व्यवहार याचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्याचेही देशमुख यांनी जाहीर केले.
दरम्यान, या निर्णयाला दोन दिवस उलटत नाहीत तोच आडत्यांनी प्रशासकांच्या निर्णयाला हुल देत पुर्वीप्रमाणे मनमानी पद्धतीने दोन ऐवजी अतिरिक्त डमी आडते ठेवण्यास सुरूवात केली. बाजार समितीने रविवारी दोनपेक्षा जास्त डमी आडते ठेवणाऱ्या सुमारे 10 ते 12 गाळ्यांवरील डमी आडत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे 8 ते 9 हजारांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे प्रशासकांनी महिनाभर अभ्यासासाठी दोन मदतनीसांना परवानगी देऊन देखील आडते त्यांच्या निर्णयाला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.