पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरीत शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प बैलगाडा शर्यतप्रेमी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 7 येथील भोसरी स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी संकूल उभारण्यात आले आहे.
तसेच, भोसरी स्मशानभूमीचेही नूतनीकरण यापूर्वीच झाले आहे. भोसरीतील गावजत्रा मैदान येथे महाराष्ट्रा संस्कृती आणि शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेला परंपरागत बैलगाडा घाट आहे.
महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत यासह कुस्तीसारख्या मर्दानी खेळाबाबत नव्या पिढीत जनजागृती व्हावी. आपली शेती-माती आणि संस्कृतीबाबत अभिमान निर्माण व्हावा. या करिता या रस्त्याच्या सुशोभीकरणात विविध शिल्प उभारण्यात येणार आहेत.