एका किटमध्ये एका कुटुंबाला आठवडाभर पुरेल इतका शिधा
पुणे – सामाजिक संस्थांसह वैयक्तिक लोकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. मात्र, मदतीच्या माध्यमातून देण्यात येणारे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत योग्य रित्या वेळत पोहोचविण्यासाठी शासनाच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मदतीचे साहित्य तातडीने पूरग्रस्तांना उपयोगी पडावे यासाठी शासनाच्यावतीने त्याचे एक स्टॅंडर्ड कीट तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये टूथपेस्ट, साबणापासून तयार स्वयंपाकाचे सर्व साहित्य असणार आहे. एका किटमधील शिधा एका कुटुंबाला किमान एक आठवडा पूरेल इतका आहे, लागल्यास अतिरिक्त शिधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशाप्रकारे मदतीचे स्टॅंडर्ड किट तयार करून देण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागातील 584 बाधीत गावातील 95 हजार 206 कुटुंबांतील एकूण 4 लाख 74 हजार 226 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांची 596 निवारा केंद्रात सोय केली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 855, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 678, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 755, सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 777 तर पुणे जिल्ह्यातील केवळ 161 लोकांचा समावेश आहे. पूरामुळे विभागात 43 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 लोक, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील 1 व्यक्तीचा समावेश आहे. सांगली शहरात रविवारी 2 पुरूषांचे मृतदेह अढळून आले असून अद्यापी त्यांची ओळख पटलेली नाही.
स्वच्छतेची कामे सुरू
पूरामुळे बाधीत ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून येत्या 4 ते 5 दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.