पायोली एक्सप्रेस पी. टी. उषा हिच्या निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक धावपटू म्हणून पळणाऱ्या खेळाडूंपेक्षा पळ काढणारे खेळाडूच भारतात जास्त दिसले. राष्ट्रीय, राष्ट्रकुल तसेच अन्य काही स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करणारे खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये यशस्वी होताना दिसले नाहीत; पण हिमा दास या खेळाडूने गेल्या वर्षीपासून सुवर्णपदकांचा धडाका लावला व आपण उषाची खरी वारसदार बनू शकतो, असा विश्वासही दिला. तो विश्वास सत्यात उतरावा.
जागतिक युवा दिन नुकताच झाला त्याच निमित्ताने हिमाच्या कामगिरीमुळे देशाला नवी आणि आश्वासक खेळाडू मिळाली, हे देखील नसे थोडके. हिमाने दोन वर्षांपूर्वी चेक प्रजासत्ताकमध्ये नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां. प्री. स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक पटकावले. तेव्हाच तिच्या कामगिरीने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जाऊ लागले. “अ स्टार इज बॉर्न’ असे मथळेही झळकू लागले. चेक प्रजासत्ताकमध्ये 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमाने 400 मीटर अंतर केवळ 52.09 सेकंद वेळेत पूर्ण करत नवा उच्चांक प्रस्थापित केला. त्या मोसमातील एकाच महिन्यात हिमाने मिळवलेले हे पाचवे सुवर्ण पदक ठरले होते.
200 व 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत पाच सुवर्णपदके पटकावणारी हिमा भारताची एकमेव खेळाडू ठरली. 20 दिवसांत पाच पैकी चार पदके तिने 200 मीटर शर्यतीत पटकावलेली आहेत. चेक प्रजासत्ताकमध्ये पहिले पदक जिंकल्यावर हिमाने पोलंडमध्ये पोजनान ऍथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो ऍथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. त्यानंतर क्लांदो मेमोरियल ऍथलेटिक्स स्पर्धेतही हिमाने 200 मीटरमध्ये तिसरे सुवर्णपदक पटकावले. ही शर्यत हिमाने 23.43 सेकंदात पूर्ण केली. जागतिक ज्युनिअर विजेत्या व 400 मीटरचा राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची 23.10 ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ ठरली. पाठदुखीचा त्रास होत असतानाही तिने ही कामगिरी केली.
मूळची आसामची असलेली हिमा व तिच्या कुटुंबाला कोपलेल्या ब्रह्मपुत्रा नदीने अनेकदा फटका दिला आहे. दरवर्षी पावसाळा आला की हिमाचे घर पाण्यात जाते. घरची परिस्थिती अशी की तिला धावण्यासाठी साधे बूटही विकत घेता येत नव्हते. दोन वर्षांपूर्वी चेक स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होताना तिने चक्क आपल्या साध्या बुटांवर अदिदास असे नाव लिहिले होते. त्यावरून अनेकांनी शेरेबाजीही केली होती. मात्र, पाच सुवर्णपदके जिंकल्यावर हिमाच्या नावाचे नवे बूट खुद्द अदिदास कंपनीने बाजारात आणले व आज त्याची संपूर्ण जगभरात प्रचंड विक्री होत आहे. गरिबीचे चटके सोसलेल्या हिमाने आपल्या खेळाबरोबरच सामाजिक जीवनातही आदर्श निर्माण केला आहे. तिचे स्वतःचे घर पाण्याखाली असूनही तिने आसामच्या पूरग्रस्तांना आपल्या मानधनातून निधी दिला. हिमा इंडियन ऑइलशी करारबद्ध असून तिला जे मानधन दिले जाते त्यातील अर्धी रक्कम तिने या लोकांना दिली.
जगभरात होत असलेल्या स्पर्धांमध्ये हिमा सहभागी होत असते. तिची कामगिरीही दखल घेण्याजोगी होती. मात्र, अद्याप तिच्याकडून देशाला ऑलिम्पिकचे पदक मिळालेले नसले तरीही ही अपेक्षा यंदा टोकियोत पूर्ण होणार का, असा प्रश्न आहे. हिमाचा समावेश टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) या योजनेत झालेला असून तिच्याकडून आता केवळ 2023 सालच्या ऑलिम्पिकमध्येच नव्हे तर, जागतिक स्तरावर होत असलेल्या अनेक स्पर्धांमध्ये पी. टी. उषाप्रमाणे यश हवे आहे. उषाला ऑलिम्पिकचे पदक जरी मिळवता आले नाही तरीही तिने स्वतःची अकादमी सुरू करून देशाला नवनवे स्टार दिले आहेत. त्यातच हिमाचाही समावेश आहे. उषाला पायोली एक्सप्रेस या नावाने तर आता हिमाला ढिंग एक्सप्रेस या नावाने संबोधले जात आहे. ढिंग याच आसाममधील गावात तिचा जन्म झाल्यामुळे हे नाव पडले आहे.
आज हिमा केवळ 21 वर्षांची असून तिच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. 400 मीटर व 200 मीटर अंतराच्या शर्यतींमध्ये तिने विक्रमी वेळ नोंदवलेली असून तिच्यासाठी ऑलिम्पिकची वेळ ब्रेक करणे कठीण नाही. 2018 साली गोल्ट कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपासूनच हिमाच्या गुणवत्तेची साक्ष भारतीयच नव्हे तर जागतिक क्रीडा विश्वाला मिळाली. 20 वर्षांखालील आशियाई स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू ठरली आहे. तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद झाली असून गेल्या दोन वर्षांत तिच्या विक्रमी कामगिरीच्या जवळपास कोणताही खेळाडू फिरकलेला नाही. देशातील मानाचा समजला जात असलेला अर्जुन पुरस्कारही तिला मिळाला आहे.
यंदा होत असलेल्या स्पर्धेतून तिने टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली तरच तिच्याकडून पदकाची अपेक्षा करता येईल मात्र, नुकतीच दुखापतीतून सावरलेल्या हिमाला ही पात्रता मिळाली नाही तरीही त्यानंतरच्या 2023 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती हे स्वप्न पूर्ण करेल याची खात्री आहे. मात्र, येत्या चार महिन्यांमध्ये टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धा होणार असल्यामुळे त्यातून ही पात्रता हिमा निश्चितच मिळवेल आणि करोडो भारतीयांचे धावण्याच्या शर्यतीतील पहिले ऑलिम्पिक पदक ती मिळवेल, असा गाढ विश्वास वाटतो. फक्त या पदकाचा रंग सोनेरी असावा हीच काय ती अपेक्षा आहे.
– अमित डोंगरे