पुणे – एमपीएससी परीक्षेत दर्शना दत्ता पवार (रा. कोपरगाव, जि. नगर) उत्तीर्ण झाली होती. वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून एमपीएससी परीक्षेत ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मात्र अचानक तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला अटक केली.तपासादरम्यान राहुलने पोलिसांना आपण केलेल्या हत्येचा कबुली जबाब देखील दिला. यासोबत पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. राहुलने आता या हत्येसाठी सोमवारच का निवडला याचाही माहिती देखील समोर आली आहे.
दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. राहुलला अटक केल्यानंतर त्याने दर्शनाचा खून केल्याचे स्पष्ट झाले होते. आता तपासादरम्यान अनेक बाबी समोर येत आहेत.
राहुल हंडोरेच्या पोलीस कोठडीची मुदत २९ जून रोजी संपली होती.पोलिसांनी अधिकच्या कोठडीची मागणी केली.त्यानंतर न्यायालयाने राहुलला ३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी तपासादरम्यान राहुलने दर्शनाच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला याबाबतची माहिती दिली आहे. राहुलने पोलिसांना सांगितले, शनिवारी आणि रविवारी राजगडावर ट्रेकर्सची खूप गर्दी असते. सोमवारी मात्र गडावर जास्त गर्दी नसते म्हणून त्याने सोमवारचा प्लॅन केला. तिला गडावर नेऊन लग्नाबाबत विचारावे अन नकार दिला तर तिथेच संपवावे अशी योजना देखील त्याने आखली होती. त्यासाठी खिशामध्ये बसेल असे ब्लेडही त्याने सोबत ठेवले होते अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
राहुलने दर्शनाला ज्या गाडीवर बसून नेले ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यासोबतच राहुलने जे ब्लेड हत्येसाठी वापरले ते देखील पोलिसांना मिळाले आहे. राहुलची कोठडी वाढून मिळाल्यामुळे या खुनाबाबतच्या आणखी काही गोष्टी देखील समोर येऊ शकतात.
कबुलीजबाबत राहुल म्हणतो
दर्शना आणि मी एकत्र अभ्यास करायचो तेव्हा मी तिला प्रपोजही केलं होत. एमपीएससीच्या परीक्षेसाठी मी तिला मदत देखील केली होती असं यावेळी राहुलने म्हंटले आहे. तसेच परीक्षा पास झाल्यानंतर तिने मला नकार दिला आणि याच रागातून मी तिला संपवल्याचं आरोपी राहुलने यावेळी सांगितलं असल्याचे समजते.
१२ जूनला गडावर गेलो असता दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मी ब्लेडने तिच्यावर वार केले त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातल्याचे देखील यावेळी राहुलने कबुलीजबाबत म्हंटले आहे. यानंतर राहुल गडावरून एकटाच परतल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते.