मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं असं बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या सोबत दोन्हही उपमुख्यमंत्री आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून यावर जोरदार टीका सुरु झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्हही उपमुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलायला येताना शिंदे उपमुख्यमंत्री पवार आणि फडणवीसांना ‘आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं’ असं बोलले. अनौपचारिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी बोलले हे विधान मीडिया कॅमेऱ्यात कैद झाले आणि या व्हिडिओवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर अजित पवार देखील त्यांना ‘येस, येस’ म्हणाले. तर सोबत असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना माईक चालू असल्याचे खुणावले.हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडिओनंतर सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची टीका विरोधकांनी सुरु केली. मात्र विरोधकांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदेंनी सडेतोड उत्तर दिल आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
व्हायरल झालेल्या संभाषणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टीकरण दिल आहे. “चर्चेपूर्वी आम्ही पत्रकार परिषदेच्या ठिकाणी बोलतच येत होतो. पण ‘सकारात्मक मुद्द्यांवरच बोलू, कोणतंही राजकीय बोलणं नको’ अशी आमची चर्चा चालू होती. ‘तेवढं बोलून आपण निघू” असं आम्ही बोललो असं शिंदे यावेळी म्हणाले. तसेच कोणतंही राजकीय भाष्य नको’ अशी आमची चर्चा होती. पण आज त्या शब्दांचे पुढचे-मागचे शब्द काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न केला गेला. विघ्नसंतोषी लोकांकडून हे प्रयत्न झाले” असं स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल.