बारामती – बारामती पॅटर्नचा अवलंब करून नांदेडमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आम्हाला यश मिळाले. बारामती पॅटर्नमुळे एकीकडे आमचा आकडा कमी झाला मात्र बारामतीचाच आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला आहे, असे काय झाले की बारामतीचा आलेख एकदमच घसरला, असा सवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया यांनी केला.
बुधवारी (दि.9) त्यांनी अचानक बारामतीला भेट दिली. बारामतीतील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे, डॉ. सुनील दराडे, पोलीस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, औदुंबर पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.
डॉ. लोहिया म्हणाले, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे लग्नसमारंभाला परवानगी देताना 50 पेक्षा अधिक लोक जमणार नाहीत याची दक्षता घेतली जावी. त्या प्रत्येक लग्नाचे व्हिडीओ चित्रिकरण असणे, लोकांची यादी आदींचे काटेकोर पालन व्हावे. कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परंतु अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना देखील सात दिवस गृह विलगीकरणात ठेवावे तसेच त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात यावे.
सातार मध्ये पोलिसांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा दाखला देत बारामती व इंदापूर मध्ये देखील अशा प्रकारची कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या. ज्येष्ठ नागरिक तसेच इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये अशा व्यक्ती घराबाहेर पडताना आढळल्यास प्रसंगी कारवाई करण्याच्या सूचना देखील यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना यावेळी लोहिया यांनी दिल्या.