हडपसर विधानसभा भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?

भूषण तुपे,जीवन जाधव व संदीप दळवी यांच्या नावांची चर्चा

हडपसर/विवेकानंद काटमोरे: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि सरकार स्थापनेनंतर शहर आणि सर्वच उपनगरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.त्यात पदाधिकाऱयांच्या निवडी आणि जबाबदारी देण्याबाबत सध्या भाजपात खलबत सुरू आहे.यात हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यापूर्वी हडपसर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व भाजपचे आमदार योगेश टिळेकर करत होते, तर यावेळी राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार म्हणून निवडून आल्याने मतदार संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.त्यामुळे आता हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजप अध्यक्षाची धुरा कोण सांभाळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी माउली कुडले हडपसर विधानसभा भाजपा अध्यक्षपदावर असताना योगेश टिळेकर भाजपचे आमदार म्हणून विजयी ठरले होते.

पुढे सन २०१५ पासून सुभाष जंगले हे या मतदार संघाचे भाजप अध्यक्ष म्हणून धुरा संभाळत आहेत. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात जंगले हे सहभाग घेऊन पक्षाचे काम करत आहेत.पक्ष संघटनेत समाधानकारक काम केल्याने त्यांना अध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी देण्याची चर्चा पक्ष संघटनेत सुरू आहे,परंतु त्यांनी दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यादृष्टीने पुन्हा अध्यक्ष होण्याची जबाबदारी नाकारली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या पदाला न्याय देण्याची क्षमता, पक्ष संघटना वाढविण्यासाठी व भविष्यात सत्तेच्या विरोधात लढा देऊ शकेल अशा व्यक्तीची पक्षाला गरज असणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात आमदारकीबरोबरच आता राज्यातही सत्ताही नाही.त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपचा अध्यक्ष निवडताना या पदाला चांगला न्याय देईल अशा व्यक्तीचा विचार होईल असे दिसते. गेल्या पंधरावड्यात तत्कालीन शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे भूषण तुपे, जीवन जाधव व संदीप दळवी यांनी हडपसर मतदारसंघाच्या अध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या आहेत.त्यानंतर नुकतेच माजी आमदार जगदीश मुळीक हे भाजपा शहराध्यक्ष झाल्याने पुन्हा एकदा यापैकी नेमके अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

ग्रामपंचायत सदस्य, अखिल भारतीय विध्यार्थी परिषद शहरमंत्री, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, ग्रामीण विकास आघाडी अध्यक्ष जनसेवा न्यास विस्वस्त, तसेच जिल्हा मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष आणि हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती पदांवर जबाबदारी सांभाळलेले भूषण तुपे हे पक्ष संघटना आपल्याला अध्यक्ष पदाची जबाबदारी देईल यासाठी आशादायी आहेत.तर पक्ष संघटनेच्या माणसाला न्याय देईल अशी अपेक्षा जीवन जाधव यांनी व्यक्त केली आहे.

महमंदवाडी ग्रामपंचायत सदस्य, युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष, विधानसभा सचिव पदांची धुरा सांभाळलेल्या जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि महापालिकेची दोन वेळा निवडणूक लढवली आहे.संदीप दळवी यांनी पक्ष संघटनेचे काम सुरू केल्यापासून आजपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमाद्वारे विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कामांची दखल घेऊन संघटनेने मतदार संघाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.आपण करत असलेल्या कामाची पावती म्हणून मतदार संघाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्ष माझ्यावर देईल ,असा विश्वास दळवी व्यक्त करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.