मुंबई : राज्यात दिवाळीच्या अगोदरपासून ते आज पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. विलगीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात संपाचे शस्त्र उगारले आहे. दरम्यान, सरकार बैठकांचे आयोजन करत महामंडळाचे विलगीकरण करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या सर्वात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट करत आतापर्यंत लालपरीला लुटणारे लुटारू कोण असे म्हणत काही माहिती दिली. मात्र हे करत असताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यानंतर त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली आहे.
‘लालपरीला लुटणारे लुटारू कोण? अशा आशयाचे एक ट्विट गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यात त्यांनी आजपर्यंत जे जे परिवहन मंत्री होऊन गेले त्यांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला आहे. हे सांगत असताना त्यांनी तत्कालीन शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे.
मात्र हे सांगत असताना त्यांच्याकडून एक चूक झाली. कारण विधासभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचाही समावेश केला. परंतु, ही चूक लक्षात येताच त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली.
२००९-२०१० मध्ये विखे पाटील काँग्रेसमध्ये असताना परिवहन मंत्री काम पाहिले.त्यावेळी त्यांनीदेखील लालपरीची दुर्दशा केली असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. मात्र विखे पाटील यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांनी हा फोटो डिलीट केला आहे.