…तर उर्वरित आयपीएल यूएईत!

मुंबई – क्रिकेटपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आता पुढचे सामने कधी खेळवण्यात येणार याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. पण स्पर्धा लवकर सुरू होणार नाही हे निश्‍चित आहे. मात्र, मागच्या वर्षीप्रमाणे आयपीएलचे उरलेले सामने यूएईत होऊ शकतात.

पुढच्या महिन्यात भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर भारत ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्येच 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ही मालिका 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. प्रोटोकॉलनुसार खेळाडूंना 14 दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल. त्यामुळे टेस्ट सीरिजआधी आयपीएलचं आयोजन होऊ शकणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिज 14 सप्टेंबरला संपणार आहे.

भारतामध्ये ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत भारतात करोनाची परिस्थिती आटोक्‍यात आली, तर आयपीएलचे उरलेले 31 सामने खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या तयारीचीही संधी मिळेल. 10 ते 12 दिवसांमध्ये आयपीएलचे उरलेले सामने खेळवता येतील. तसेच वर्ल्ड कपचे आयोजन भारताऐवजी यूएईमध्ये झाले, तर मागच्या वर्षीप्रमाणे आयपीएलच्या उरलेल्या मॅच तिकडेही खेळवल्या जाऊ शकतात. आयपीएलबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्‍ला म्हणाले, वर्षभरात पुढे कधी आयपीएलचे आयोजन करता येऊ शकेल का? हे आम्ही बघू. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही स्पर्धेचे आयोजन करू शकत नाही.

भारतातल्या करोनाच्या संकटामुळे मागच्या वर्षाची आयपीएल यूएईमध्ये खेळवली गेली होती. तेव्हा बोर्डाला 4 हजार कोटींच्या महसुलाची अपेक्षा असल्याचे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले होते. यावेळीही बोर्डाची तेवढ्याच उत्पन्नाची अपेक्षा असेल. पण स्पर्धा रद्द झाल्यामुळे ब्रॉडकास्टर, बोर्ड यांच्यासह टायटल स्पॉन्सर यांनाही
धक्का बसला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

“भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच करोनाने आयपीएल स्पर्धेच्या बायोबबलमध्येही शिरकाव केला. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मिळून यंदाचा मोसम अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी खेळाडू, या स्पर्धेशी जोडले गेलेले लोक, आमचे कर्मचारी, ग्राऊंड स्टाफ आणि पंच यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही त्यांच्या जिवाशी खेळू शकत नाही.
– जय शहा, बीसीसीआयचे सचिव

फ्रॅंचायजी, भागधारकांचा पाठिंबा

बीसीसीआयने घेतलेल्या स्थगितीच्या निर्णयास फ्रॅंचायजी आणि आयपीएलच्या भागधारकांनी पाठिंबा दर्शविला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एका निवेदनात म्हटले की, आम्ही सर्व यात एकत्र आहोत. व्हीव्हो आयपीएल 2021 मधील प्रत्येकाच्या सुरक्षेला आणि सर्वांनाच महत्त्व आहे. बीसीसीआयच्या या स्पर्धेला स्थगिती देण्याच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो, असे म्हटले आहे. तसेच माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हिन पीटरसन, कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य मार्गदर्शक डेव्हिड हसी यांनी कौतुक केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.