पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत दरवर्षीप्रमाणे यंदाही दिरंगाई केली जात आहे. शाळा सुरू होऊन सहा महिने उलटले असले, तरी अद्याप गणवेशाच्या निविदा काढण्यात आलेल्या नाही. त्यामुळे बोर्डाच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत अद्यापही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये मागील काही वर्षापासून मोफत गणवेश देण्यास सुरुवात केली आहे. दोन गणवेश, शूज, सॉक्स, तसेच थंडीसाठी स्वेटर असे गणवेशाचे स्वरूप आहे.
मात्र, हे गणवेश कधीही विद्यार्थ्यांना वेळेत मिळाले नसल्याची बाब पुढे आली आहे. विद्यार्थ्यांना शाळा सुरू होतानाच गणवेश मिळणे गरजेचे असते. मात्र, बोर्डातर्फे गणवेशाबाबत नेहमीच दिरंगाई होते. गेल्या वर्षीदेखील ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. यंदा मात्र ऑक्टोबर महिना संपत आला असूनही अद्याप गणवेशाच्या निविदाच मंजूर झालेल्या नाहीत.
सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर केवळ चर्चा झाली आहे. प्रत्यक्षात निविदा काढण्याबाबत निर्णय प्रलंबित आहे. एकीकडे बोर्डाची डबघाईल आलेली आर्थिक स्थिती आणि निविदा प्रक्रियेतील विलंब, निविदांवर होणारी नाहक चर्चा, निविदा मान्य केल्यानंतर ठेकेदाराने गणवेशाचे सॅम्पल कापड दाखविण्यासाठी सर्वसाधारण सभेत आणल्यानंतर त्यावर नगरसेवकांचे एकमत झाले नाही.