पंतप्रधान कार्यालयास ट्‌विटरद्वारे केलेल्या तक्रारीची दखल

सोनसळ घाटातील बोगदा दुरुस्तीला एक ऑक्‍टोबरपासून सुरुवात

कराड – कराड तालुक्‍यातील शेणोली येथील रेल्वे स्टेशनजवळील सोनसळ घाटामधून जाणाऱ्या बोगद्यातील पुलामध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने या दुर्गंधीयुक्त पाण्याचा तसेच पडलेल्या खड्ड्यांचा प्रवाशांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाकडे स्थानिकांनी तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. सोनसळ (जि. सांगली) येथील सामाजिक कार्यकर्ते विश्राम अशोकराव कदम यांनी ट्‌विटरद्वारे पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा केला असता याची तात्काळ दखल घेत पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेमंत्र्यांनी आदेश जारी केले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या समस्येस सोडविण्यास ट्‌विटरद्वारे यश मिळाले आहे. सदरच्या बोगदा पुलाच्या दुरुस्तीचे कामास एक ऑक्‍टोंबरपासून सुरुवात होत असून पुल बंद ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरच्या पुलामध्ये लगतच्या संजयनगर वसाहतीमधील सांडपाणी आल्याने प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. तसेच पाणी साचून राहिल्याने याठिकाणी खड्डे पडले असून वहानधारकांना कसरत करावी लागत आहे. याबाबत विश्राम कदम यांनी सातारा जिल्हाधिकारी यांनाही तक्रार दिली होती.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश कराड व मिरज विभागाच्या रेल्वे आगार व्यवस्थापकांना दिला होता. मात्र आदेश देऊनही याठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही. यासंदर्भात त्वरीत कारवाई होण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे ट्‌विटर आणि ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली असता याची तात्काळ दखल घेत ना. गोयल यांनी कनिष्ठ पातळीवर योग्य त्या कारवाईचे आदेश दिले. सदरच्या पूलाचे आणि पूलाखालील रस्त्याचे काम येत्या एक ऑक्‍टोबरपासून सुरु होत आहे. तसा लेखी आदेश रेल्वे प्रशासनाकडून पारीत झालेला असून, रेल्वे मंत्रालयाकडून संबंधित ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती होणार असल्याने प्रवाशांसह परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

एक ऑक्‍टोबरला सुरु होणारे पुलाच्या दुरुस्तीचे काम पंधरा ऑक्‍टोंबरपर्यंत चालू राहणार आहे. यामुळे सदर पुलाखालून दोन्ही दिशेने होणारी वहातूक बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच वहातूकीसाठी पर्यायी मार्ग शोधून त्याचा वापर करावा, असा विनंतीपूर्वक आदेश रेल्वे विभागाने ई-मेलद्वारे जारी केला आहे.

सदरच्या पुलाच्या दुरवस्थेमुळे याठिकाणी माझ्यासमोर दोन ते तीन अपघात झालेले मी बघितले होते. त्यामुळे मी संवेदनशील मार्गाने याकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा केला. जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या. परंतु दिरंगाई होत असल्याने रेल्वे मंत्र्यांकडे ट्‌विटरद्वारे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनीही याची तात्काळ दखल घेतली आहे, याचे खूप समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया विश्राम कदम यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.