सातारा – तब्बल 90 किलोमीटर सायकलिंग, 2 कि.मी. पोहणे आणि 21 कि.मी. धावणे अशी खडतर आयर्न मॅन स्पर्धा इटलीत 22 सप्टेंबरला पार पडली. शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या स्पर्धेत भारतीय लष्करातील ले. कर्नल विकास बबन पवार यांनी यश मिळवत तिरंगा फडकवला. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेतील दुखापतींमुळे हाताची शस्त्रक्रिया झाली असतानाही पवार यांनी जिद्द, चिकाटी दाखवत भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सातारा तालुक्यातील मांडवे गावचे सुपुत्र विकास बबन पवार हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर सेवा बजावत आहेत. नुकत्याच गोवा येथे झालेल्या ट्रायथक्लॉन स्पर्धेत त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. त्यावर नुकतीच शस्त्रक्रियाही झाली होती. अशा परिस्थितीतही जिद्दी विकास पवार यांनी इटली येथील आयर्न मॅन या शर्यतीत भाग घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.
इटलीमध्ये 22 सप्टेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात मोठी असलेल्या स्पर्धेत एकूण 7 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. यात 100 देशातील 1600 स्पर्धक होते तर चार स्पर्धक भारतीय होते. विकास बबन पवार यांनी ही स्पर्धा अवघ्या 7 तास 17 मिनिटात पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब पटकावला. त्यांच्या यशामुळे भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत
आहे.