मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वताहून पुढे येऊन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती देशाला आणि संसदेला दिली पाहिजे. त्यात लपवण्यासारखे काय आहे असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांची डिग्री संसदेच्या प्रवेशद्वारावरच लाऊन ठेवली पाहिजे त्यातून खासदारांना आणि देशवासियांना त्यांची खरी पदवी आणि त्यांचे शिक्षण याची माहिती मिळू शकेल असे त्यांनी म्हटले आहे. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकून एमएची डिग्री मिळवली आहे. एन्टायर पॉलिटिकल सायन्स या विषयात त्यांना एमएची पदवी मिळाली आहे. मोदींनी आता नवीन संसद बांधली आहे. त्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच त्यांची ही डिग्री लावली गेली पाहिजे अशी उपरोधिक सुचनाही त्यांनी केली. यात लपवण्यासारखे काय आहे आणि यात कोणती भानगड असू शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आपचे नेते केजरीवाल यांनी केलेल्या अर्जानुसार केंद्रीय माहिती आयुक्तांनी गुजरात विद्यापीठाला नरेंद्र मोदी यांचे पदवीप्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. पण गुजरात विद्यापीठाने केंद्रीय माहिती आयुक्तांच्या आदेशाला गुजरात हायकोर्टात आव्हान दिले होते.
त्यावर हायकोर्टाने माहिती आयुक्तांचा आदेश रद्द करून केजरीवालांनाच 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चांगलेच चर्चेत आले आहे.राऊत म्हणाले की या देशात कोणाचेही शैक्षणिक प्रमाण पत्र मागवले जाते, मग पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्रात लपवण्यासारखे काय आहे.
त्यामुळे या विषयावर खुद्द मोदींनीच स्वताहून पुढे येऊन खुलासा करण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या बहुतांश लोकांच्या पदव्या खोट्या आहेत असे विधानही राऊत यांनी यावेळी केले. ही बोगस डिग्रीची फॅक्टरीच आहे असेही ते म्हणाले. अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी पंतप्रधानांच्या पदवीचा विषय उपस्थित केला जात आहे काय असे विचारता ते म्हणाले की अदानी प्रकरण संपलेले नाही. कालच्या महाराष्ट्रातील सभेतही उद्धव ठाकरे यांनी हा विषय उपस्थित केला होता. आणि आम्ही हा विषय संसदेत उपस्थित करीत राहु.