कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
पुणे : पेरूचा भाव कमी न करण्याच्या किरकोळ कारणावरून पेरू विक्रेत्यावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खराडी बायपास रस्त्यावर खडली.
या प्रकरणात चंदनगर पोलिसांनी मयुर रामेश्वर खुरंगळे (वय. 30, रा. संभाजीनगर, चंदननगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरेश शिंदे (वय 42, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रशांत जाधव (वय 30, रा. कुंजीर वस्ती, मांजरी) असे वार झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. दरम्यान, आरोपीविरुद्ध 2017 मध्ये मारामारीचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते खराडी बायबास रस्त्यावर डॉमिनोज पिझ्झा शॉपसमोर पेरू विक्री करत होते. त्यावेळी आरोपी मयुरने त्यांना कमी किंमतीत पेरू मागितले. मात्र, परवडत नसल्याने त्यांनी मयुरला पेरू देण्यास नकार दिला. त्याच रागातून मयुरने प्रशांतच्या पोटावर पाठीवर, मांडीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव करीत आहेत.