वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू सुनील नरेन हे एक अजब रसायन आहे. आपण म्हणतो ना “जिथे कमी, तिथे आम्ही’. त्याच धर्तीवर “जिथे कमी, तिथे नरेन’ असेच म्हटले पाहिजे. आयपीएलच्या इतिहासात सलामीवीरापासून अखेरच्या क्रमांकावर नरेनने फलंदाजी करत अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने पहिल्यापासून अकराव्या क्रमांकापर्यंत सगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत मिस्ट्री गोलंदाज अशी बिरुदावली सर्वात पहिल्यांदा मिळवली. त्याने एक फलंदाज म्हणून या स्पर्धेच्या इतिहासात 1 हजार दावा पूर्ण केल्या आहेत. त्याचे नावही भारताचे विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्याच नावावरून ठेवण्यात आले आहे. त्याचे वडील गावसकर यांचे खूप मोठे फॅन असल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नावही तेच ठेवले.
योगायोग असा की, नरेनही क्रिकेटपटूच बनला. टी-20 क्रिकेटमध्ये निर्धाव षटके तर आता अनेक गोलंदाजांनी टाकली आहेत. मात्र, हा मान पहिल्यांदा मिळवणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. ही कामगिरी त्याने कॅरेबियन लीग स्पर्धेत केली होती. कॅरम बॉल, फ्लोटर, स्किडर्स चेंडू टाकण्याची त्याची खासियत आहे. केवळ तीन बोटांच्या ग्रीपवर फास्टर वन टाकण्याची त्याची ख्याती व किमया दोन्ही आहे.
एक हात जराही न हलवता केवळ बोलिंग हॅंडचा उपयोग करत फिरकी गोलंदाजी टाकण्याची त्याची शैली अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन जाते. याच शैलीमुळे तो एकदा आयसीसीच्या रडारवरही आला होता. त्याच्या गोलंदाजी शैलीत दोष असल्याचे सांगत त्याच्यावर बंदीही लावली गेली. मात्र, हा पठ्ठ्या आपली शैली सुधारत पुन्हा पुनरागमन करता झाला.
गळ्यात जाडजूड सोन्याचा गोफ, मनगटात स्वतःच्याच नावाचे कडे घालत खेळणारा हा वेस्ट इंडिजचा प्रख्यात म्हणून ओळखला जातो. 2012 सालापासून आतापर्यंत त्याने कोलकाताकडूनच खेळ करत आपली गुणवत्ता व उपयुक्तता पाहूनच कोलकाता संघ व्यवस्थापनाने त्याला एकदाही रिलीज केले नाही. त्यामुळेच कोलकाता संघाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ इतकेच काय कर्णधारही बदलले. मात्र, नरेन संघात आजही कायम आहे, हीच त्याच्या गुणवत्तेची पावती आहे.